

खानापूर : माचीगड-अनगडीतील (ता. खानापूर) सुब्रम्हण्य साहित्य अकादमीतर्फे रविवारी (दि. 4) 29 वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्यिक आणि मराठीप्रेमींच्या स्वागतासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. मायमराठीचा जागर करणारे तालुक्यातील एकमेव संमेलन असल्याने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
जालना येथील प्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. संजीवनी तडेगावकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, माजी आमदार अरविंद पाटील, उद्योजक मुकुंद पाटील, डॉ. रफिक हलशीकर, धनश्री सरदेसाई, मऱ्याप्पा पाटील, प्रसाद मजूकर, विकास देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे. पुण्यातील वास्तू विशारद पीटर डिसोजा स्वागताध्यक्ष आहेत. मारुती महाराज व हेस्कॉमचे माजी अधिकारी रामा आरुंदे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता ग्रंथ दिंडीचे उद्घाटन होणार आहे. एकनाथ महाराज मंदिरापासून ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे. लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते सुब्रम्हण्य पूजन आणि प्रभाकर पारिश्वाडकर यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन होणार आहे.
सकाळी साडेनऊ वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. पहिल्या सत्रात अध्यक्षांचे अभिभाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रात ’कवितेच्या जाऊ गावा’ हे निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. प्रा. वैशाली नायकवडे, गीतकार दस्तगीरहुसेन नदाफ, उर्मिला शहा हे कवी सहभागी होणार आहेत. डॉ. चंद्रकांत पोतदार या सत्राचे निवेदन करणार आहेत. तिसऱ्या सत्रात ’काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती’ या विषयावर तुकाराम चिंचणीकर यांचे व्याख्यान होणार आहे. चौथ्या सत्रात हास्ययात्रा हा शरद जाधव यांचा विनोदाचा कार्यक्रम होणार आहे. विद्यार्थी, शिक्षक, वारकरी आणि मराठी प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील यांनी केले आहे.
उत्साहाचे वातावरण
संमेलनासाठी मराठी शाळेच्या समोरील प्रांगणात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. गावातील रस्ते, प्रमुख चौक भगवे ध्वज आणि पताकांनी सजविण्यात आले आहेत. संमेलनामुळे गावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.