

सातारा : भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांना जितके महत्त्व साहित्य व्यवहारात मिळायला हवे तितके मिळालेले नाही. त्यामागे आकलनाचा दुष्काळ व नकारात्मक विषयांना अवास्तव महत्त्व नको असा प्रवाह, अशी कारणे आहेत. साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच रहस्य, भय, गूढ कथांवर परिचर्चा होत असून, आता त्याला स्वतंत्र साहित्य प्रकाराचा दर्जा मिळावा, असा सूर परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंत यांनी व्यक्त केला.
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे? या विषयावर विशेष परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. यात प्रसिद्ध भयकथा लेखक हृषिकेश गुप्ते, समीक्षक व लेखक गणेश मतकरी, ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक प्रवीण टोकेकर, संभाजीनगरहून आलेले समीक्षक डॉ. गोविंद बुरसे, अमरावतीहून आलेले अभ्यासक डॉ. राजेंद्र राऊत हे सहभागी झाले होते. उपस्थित सर्व मान्यवर लेखक-विचारवंतांचे स्वागत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. पत्रकार जयदीप पाठक यांनी सर्वांशी संवाद साधला, तर ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे यांनी निवेदन केले.
हृषिकेश गुप्ते म्हणाले, मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा दुर्लक्षित असण्याचे कारण त्यामध्ये असणारा आकलनाचा अभाव हा आहे.गणेश मतकरी म्हणाले, भयकथा, रहस्यकथा यांचा दुष्काळ अगदी सुरुवातीपासूनच आहे. रहस्य साहित्याला मुख्य धारेतील साहित्य मानले न गेल्याने कायमच दुय्यम लेखले गेले. प्रवीण टोकेकर म्हणाले, रहस्यकथा, भयकथा आणि गूढकथा हे स्वतंत्र प्रकार आहेत. वाचक हा त्यांचा साक्षीदार आहे.
डॉ. राजेंद्र राऊत म्हणाले, चोरून वाचायचे साहित्य आणि हे साहित्य वाचून पिढी बिघडेल, अशी भीती पूर्वी व्यक्त केली जात असे. त्यातून हा वाङ्मय प्रकार दुर्लक्षित राहिला. डॉ. गोविंद बुरसे म्हणाले, लोकांना या विषयात खूप रस आहे. त्यांना समजून घेण्याचीही खूप इच्छा आहे. परंतु, दुर्दैवाने या विषयात दर्जेदार लेखनाची वानवा आहे. हे चित्र बदलण्यासाठी अनेकांनी पुढे येऊन या विषयांत लेखन करायला हवे.