सातारा : राजेवाडी तलाव दुष्काळी जनतेसाठी वरदान | पुढारी

सातारा : राजेवाडी तलाव दुष्काळी जनतेसाठी वरदान

शिखर शिंगणापूर : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्यपूर्व काळात दुष्काळी भागातील जनतेला शेतीसह पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सुमारे 150 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला राजेवाडी तलाव अनेक वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरला आहे. माणगंगा नदीवर बांधलेल्या राजेवाडी मध्यम प्रकल्पामुळे सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येत असल्याने राजेवाडी तलाव माणदेशातील दुष्काळी जनतेसाठी वरदान ठरला आहे. अनेक वर्षानंतर राजेवाडी तलावाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने दुष्काळी भागातील पर्यटकांसाठी राजेवाडी तलाव परिसर आकर्षण ठरत आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हिंगणी तसेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी या गावांच्या हद्दीत असलेल्या राजेवाडी तलावाची निर्मिती सुमारे 150 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केली आहे. माणगंगा नदीवर निर्माण केलेला हा तलाव राजेवाडी मध्यम प्रकल्प तसेच म्हसवड मध्यम प्रकल्प या नावाने ओळखला जात असून राजेवाडी तलावाचे कार्यक्षेत्र जलसंपदा विभागाच्या नीरा उजवा कालवा पंढरपूर उपविभागाच्या कार्यकक्षेत आहे.

स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश राजवटीत माणदेशात दुष्काळाचे संकट ओढवल्याने ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांनी त्याकाळातील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा तसेच भविष्यात जनतेला दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून माणगंगा नदीवर राजेवाडी तलावाची निर्मिती केली. राणी व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1876 मध्ये उभारणीस सुरुवात केलेल्या राजेवाडी मध्यम प्रकल्पाचे बांधकाम 1885 मध्ये पूर्ण झाल्याची नोंद आहे.

दगड, माती व चुन्यामध्ये बांधलेल्या या तलावाच्या बांधकामाचे दरम्यान, राणी व्हिक्टोरिया यांनी भेटी दिल्याच्याही नोंदी आहेत. या तलावाची 100 वर्षानंतर दुरुस्ती व्हावी यासाठी ब्रिटिशांनी त्याकाळातच तरतूद केल्याने 1976 मध्ये महाराष्ट्र शासनाने या तलावाची डागडुजी केल्याची माहिती मिळाली आहे. सातारा, सांगली व सोलापूर जिल्हा सीमेवर असलेला राजेवाडी तलाव म्हसवड शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. या तलावाची लांबी 2743 मीटर तर उंची सुमारे 25 मीटर एवढी आहे. तलावाच्या सांडव्याच्या बंधार्‍यांची लांबी 1158 मीटर असून उंची साधारण 22 फूट आहे. सुरुवातीला या तलावाची पाणी साठवण क्षमता 3070 दशलक्ष घनफुट (3 टीएमसी) एवढी होती.

मात्र अनेक वर्षे गाळ साठून राहिल्याने ही क्षमता 1378 दशलक्ष घनफुटाने घटली असून सध्या तलावाची पाणीसाठवण क्षमता 1692 दशलक्ष घनफूट (साधारण दीड टीएमसी) एवढी आहे. तलावाच्या पाण्यामुळे लाभ मिळणारे 16130 हेक्टर एवढे लागवडलायक क्षेत्र असले तरी माण, आटपाडी व सांगोला तालुक्यातील 4049 हेक्टर क्षेत्रच प्रत्यक्षात सिंचनाखाली येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे शाखाअभियंता अभिमन्यू जाधव यांनी दिली.

राजेवाडी तलावातील पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील म्हसवड, हिंगणी, देवापूर, पळसावडे या गावांना, तर सोलापूर जिल्ह्यातील कटफळ, खवासपूर, वाकी, महूद बु, अचकदाणी, चिकमहूद, लक्ष्मीनगर या गावांना तसेच सांगली जिल्ह्यातील राजेवाडी, लिंगविरे, पुजारवाडी, दिघंची, उंबरगाव या गांवातील शेतकर्‍यांना होत आहे. राजेवाडी प्रकल्पामुळे 20 ते 25 गावांतील क्षेत्र सिंचनाखाली येत असल्याने दुष्काळी पट्ट्यातील शेतकर्‍यांना याचा लाभ होत आहे.

2019 मध्ये जवळपास दहा वर्षानंतर राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सध्याही पाणी सांडव्यावरुन ओसंडून वाहत असल्याने माणगंगा नदी प्रवाहित होऊन नदीकाठच्या गावांना त्याचा फायदा होत आहे. तसेच दुष्काळी भागातील जनतेसाठी राजेवाडी तलाव परिसर म्हणजे दुष्काळी पर्यटनस्थळ बनले आहे. दिवसेंदिवस तलाव परिसरात दुष्काळी पर्यटन बहरत चालले असून सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी राजेवाडी तलाव आकर्षक ठरत
आहे.

मध्यम प्रकल्प माणदेशासाठी वरदान…

राजेवाडी तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे तलावातील पाणी साठणारा पाणलोट क्षेत्र परिसर सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या हद्दीमध्ये येतो, तर तलावाच्या बंधार्‍यांची भिंत व पाच दरवाजे तसेच सांडव्याचा कालवा असलेला परिसर सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या हद्दीमध्ये येतो. तसेच तलाव्यातील पाण्याचा अधिकाधिक उपयोग सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांना होतो.

राजेवाडी तलाव प्रकल्पामुळे माणसह, सांगोला व आटपाडी तालुक्यातील शेतकर्‍यांना फायदा झाला आहे. केवळ उन्हाळी पिके घेणार्‍या लाभक्षेत्रातील माणदेशी शेतकर्‍यांचा कल आता ऊस, द्राक्षे, केळी, डाळिंब यासारखी नगदी पिके घेण्याकडे गेला असून या प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील शेतकरी सुखावला आहे.
– रमेश कापसे, प्रगतशील शेतकरी, म्हसवड

हेही वाचलं का?

Back to top button