कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 53,299 मतदारांची वाढ झाली आहे. जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 31,75,205 वर गेली. मतदारांत पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात सुमारे तीन हजार मतदार वाढले आहेत, तर जिल्ह्यात नव्या मतदार यादीनुसार नवमतदारांची संख्या 35,697 इतकी झाली आहे.
जिल्ह्याची अंतिम मतदार यादी 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पाश्वर्र्भूमीवर यावर्षी जिल्ह्यात मतदारांच्या संख्येत चांगली वाढ झाली आहे.
कोल्हापूर शहरातील काही प्रभागांचा समावेश असलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात 7 हजार 667 मतदार वाढले आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे अवघे 431 मतदारांची वाढ झाली आहे. कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांतील महापालिका क्षेत्रात सुमारे तीन हजारांवर मतदारांची वाढ झाली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक मतदारांची वाढ कागल मतदारसंघात झाली आहे. कागलमध्ये 7 हजार 676 मतदार वाढले आहेत. जिल्ह्यात एकूण वाढलेल्या मतदारांपैकी 26 हजार 555 पुरुष, तर 26 हजार 712 महिला मतदार आहेत. 32 इतर (ट्रान्स जेंडर) मतदारही वाढले आहेत. शिरोळ मतदारसंघात सर्वाधिक 4 हजार 123 महिला मतदार वाढले आहेत.
जिल्ह्यात 9,045 सैनिक मतदार
जिल्ह्यात 9,045 सैनिक मतदारांची नोंद झाली आहे. यापैकी 8, 804 पुरुष, तर 241 महिलांंचा समावेश आहे. सर्वाधिक चंदगड विधानसभा मतदारसंघात 2,272, तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तरमधील 95 मतदार आहेत.