सातारा : लग्नसराई अडकली निर्बंधांच्या जोखडात | पुढारी

सातारा : लग्नसराई अडकली निर्बंधांच्या जोखडात

सातारा : मीना शिंदे

लग्नसराई म्हटल की धामधूम सर्वत्र पहायला मिळते. गेल्या दोन वर्षात ही धामधूम कोरोना महामारीमुळे थांबली होती. अनेकांनी लग्नसोहळे धुमधडाक्यात साजरे करण्यासाठी महामारीचा प्रभाव कमी होण्याची वाट पाहीली होती. महामारी कमी होताच शासनाने निर्बंध शिथील केले आणि लग्नसराईतील धामधूम पुन्हा सुरु झाली. मात्र कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने डोके वर काढल्याने शासनाने पुन्हा लग्नसमारंभांसह अन्य सोहळ्यांवर निर्बंध पुन्हा लागू केले आहेत. त्यामुळे लग्नसराई पुन्हा निर्बंधांच्या जोखडात अडकली आहे.

सध्या लग्नसराई हंगाम जोमात सुरु आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील संस्मरणीय सोहळा असतो. तो अप्रतिम आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. त्यातच हौसेला मोल नसल्याने पै-पाहुणे, मित्रमंडळी, आप्तेष्ट एकत्र येत धम्माल करतात. लग्नसोहळ्याच्या निमित्ताने मागची, सध्याची आणि पुढची अशा तीन पिढ्या एकत्र येत असल्याने विचार, संस्कार, परंपरांची नाळ जोपासली जाते. त्यामुळे लग्नसराई म्हणजे आनंद, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा उत्सव असतो. त्यामुळे जेवढे नातेसंबंध, गोतावळा जास्त तेवढे वर्‍हाड जास्त हे समीकरणच जुळले आहे.

मात्र मागील दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे सण-समारंभांबरोबरच लग्न सोहळेही साधेपणाने साजरे झाले. ही परिस्थिती निवळेल आणि मग धूमधडाक्यात लग्न सोहळा पार पाडता येईल, यासाठी अनेकांनी आपले विवाह सोहळे पुढे ढकलले होते. महामारीचा प्रभाव कमी होण्याची सुमारे दीड वर्ष वाट पाहिली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर ओसरल्यानंतर परिस्थिती सुधारु लागली. त्यामुळे गणेशोत्सवापासून हे निर्बंध शिथील झाले होते. मंदिरेही खुली झाली.

त्याचबरोबर लग्न समारंभांची धूमही वाढली. धूमधडाक्यात भरपूर वर्‍हाडी मंडळींच्या साक्षीने रेशीम गाठी बांधल्या जावू लागल्या. त्यामुळे हौस-मौजेला उधाण आले. मंगलकार्यालये, केटिरिंग, फोटोग्राफी, ड्रेस डिझायनींग, घोडा, वाजंत्री, शिंग-तुतारी, मेकअप, ड्रेपरी मेकिंग, हेअरस्टाईल यांसह लग्नसोहळ्यांवर अवलंबून असलेल्या इतर व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आले होते. प्रीवेडिंग फोटोग्राफीलाही उधान आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध निसर्गरम्य ठिकाणांना ही महत्व आले आहे. प्रीवेडींगमुळे विवाह समारंभांइतकेच महत्व आले आहे. त्यामुळे सर्वच अर्थकारणही वाढले.

परंतू मागील काही दिवसांपासून कोरोनाचा नवीन व्हेरीयंट ओमायक्रॉनचा कहर वाढू लागला आहे. त्यामुळे गर्दी करणार्‍या कार्यक्रमांमध्ये संसर्गाची धास्ती वाढू लागली आहे. त्यामुळे शक्यतो गर्दी होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस समारंभामध्ये उपस्थितांच्या संख्येवर पुन्हा मर्यादा आल्या आहेत. केवळ 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळे पार पडणार आहेत. सुमारे दोन वर्ष वाट पाहून धूमधडाक्यात लग्न समारंभासाठी थांबवलेले लग्न सोहळे पुन्हा एकदा मर्यादेच्या चौकटीत पार पाडावे लागणार आहेत. त्यामुळे संपूर्ण लग्नसराईच निर्बंधांच्या जोखडामध्ये अडकल्याने विवाह इच्छुकांच्या उत्साहावर विरजन पडले आहे. जानेवारी महिन्यात लगीन गाठ बांधणार्‍या वधू-वरांचा हिरमोड झाला आहे.

रेशीम गाठीला मोजकेच साक्षीदार…

पूर्वी लग्न सोहळा किती मोठा झाला हे त्या सोहळ्याला किती जास्त वर्‍हाडी उपस्थित होते यावरुन ठरत असते. पण आता ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लग्नसोहळ्यांसाठी केवळ 50 लोकांची उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे सर्व आप्तेष्ठ, मित्र-मंडळी यांच्या उपस्थितीवर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे लग्नसमारंभासाठी मोजक्याच नातेवाईक व मित्रमंडळींना उपस्थित रहाता येणार आहे. विवाह संस्काराची रेशीम गाठ बांधताना मोजकेच साक्षीदार असणार आहेत.

Back to top button