कराडः पुढारी वृत्तसेवा
कराड तालुक्यातील कार्वे-कोरेगाव रस्त्यालगत उसाच्या शेतात २५ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला. डोक्यात दगड घालून युवतीचा खून करण्यात आल्याची घटना सोमवार दिनांक 3 रोजी सकाळी समोर आली. या घटनेने कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अधिक माहिती अशी की कार्वे-कोरेगाव रस्त्यालगत असलेल्या भैरोबा मंदिराच्या जवळ उसाच्या शेतामधून जाणाऱ्या वाटेवर युवतीचा मृतदेह आढळून आला.
मृतदेह शेजारीच मोठा दगड पडला होता. त्यामुळे तिच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाशेजरी पडलेला दगडाला रक्त लागले होते.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला आहे. दरम्यान प्रथमदर्शनी संबंधित युवतीच्या डोक्यात दगड घातल्याचे स्पष्ट झाले आहे. युवतीचे नाव अद्याप समजू शकले नाही. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.