सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव : फलटणमधील तिघे बाधित, पण रुग्ण ठणठणीत

सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव : फलटणमधील तिघे बाधित, पण रुग्ण ठणठणीत

सातारा/फलटण : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉन या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. फलटण शहरामध्ये आठ दिवसांपूर्वी युगांडा (इस्टन आफ्रिका) येथून आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. मात्र, या तिन्ही रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

फलटण शहरामध्ये एकाच कुटुंबातील चौघेजण परदेशातून दि. 9 डिसेंबर रोजी आले होते. त्यामध्ये पती, पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. आफ्रिकेतील युगांडावरून हे चौघेजण मुंबईला आले तेव्हा विमानतळावर त्यांची कोरोना टेस्ट केली होती. त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

यानंतर रविवार दि.12 डिसेंबर रोजी ते फलटणला येऊन होम आयसोलेट झाले होते. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने त्यांचे स्वॅब घेतले. सोमवार दि. 13 डिसेंबर रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचा संशय प्रशासनाला आला होता.

त्यामुळे आरोग्य विभागाने दि.13 डिसेंबर रोजी ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवलेे होते. पुणे प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून शनिवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. या चौघांपैकी पती, पत्नी व लहान मुलगीला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे तपासणी अहवालात म्हटले आहे. मात्र, या रुग्णांची प्रकृती चांगली व ठणठणीत आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून उपाययोजना तातडीने राबवल्या जात आहेत.

फलटणमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. मात्र, नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. कोव्हिड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. लसीकरण करून सहकार्य करावे.
– डॉ. सुभाष चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news