नवी मिस युनिव्हर्स हरनाझ संधू, भारताची मान उंचावली! | पुढारी

नवी मिस युनिव्हर्स हरनाझ संधू, भारताची मान उंचावली!

सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर हरनाझ संधूच्या ( harnaaz sandhu ) रूपाने 21 वर्षांनी भारताने विश्वसुंदरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. भारतीय स्त्रियांच्या संस्कृती, सौंदर्य आणि स्वभावमूल्यांचं जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणारी हरनाझ भविष्यातही आपल्या कर्तृत्वाने भारताची मान उंचावेल! अशी खात्री आहे.

संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणार्‍या ‘मिस युनिव्हर्स 2021’चा निकाल नुकताच जाहीर झाला. पंजाबच्या हरनाझ संधूने ( harnaaz sandhu ) सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही स्पर्धा जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. अभिनेत्री सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर तब्बल 21 वर्षांनी मिस युनिव्हर्सचा मान मिळवणारी 21 वर्षांची हरनाझ तिसरी भारतीय ठरली आहे.

इस्रायलच्या इलियट शहरात पार पडलेली ‘मिस युनिव्हर्स 2021’ ही सौंदर्यस्पर्धा बर्‍याच कारणांनी विशेष ठरली. त्यापैकी एक कारण होतं सुप्रसिद्ध टीव्ही होस्ट ‘स्टीव हार्वे’चं पुनरागमन. गेल्यावर्षी कोरोनामुळे स्टीव हा शो होस्ट करू शकला नव्हता. विनोदाचं भन्‍नाट टायमिंग असलेल्या स्टीवची अनुपस्थिती प्रेक्षकांना खटकली होती. या स्पर्धेत मात्र ती कसर भरून काढण्यात स्टीव पुरेपूर यशस्वी ठरला. ही स्पर्धा भारतीयांसाठी विशेष महत्त्वाची ठरली. त्यांचं कारण होतं स्पर्धेचा निकाल! तब्बल 80 सौंदर्यवतींमधून निवड झालेली 21 वर्षांची हरनाझ संधू  ( harnaaz sandhu ) यावर्षीची विश्वसुंदरी ठरली. भारताच्या पंजाब राज्यातून येणार्‍या हरनाझने सौंदर्य आणि बुद्धिमतेच्या जोरावर ‘मिस युनिव्हर्स’च्या मुकुटावर आपलं नाव कोरलं.

हरनाझचा ( harnaaz sandhu ) जन्म पंजाबच्या गुरदासपूरमधल्या कोहली गावचा. तिचे वडील प्रीतमपालसिंग हे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात, तर आई रबिंदरकौर स्त्रीरोगतज्ज्ञ. हरनाझचं आतापर्यंतचं शिक्षण चंदीगढमधूनच झालं आहे. वयाच्या सतराव्या वर्षीच तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. सौंदर्य स्पर्धांच्या ग्लॅमरस जगात 2017 ला तिचं पदार्पण झालं, तेही घरात कुणालाही न सांगता! त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ‘मिस चंदीगढ’ झालेल्या हरनाझला तिच्या घरच्यांनीही पुरेपूर समर्थन दिलं.

पुढच्याच वर्षी तिने ‘मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया’वर शिक्‍कामोर्तब केलं. 2019ला ‘फेमिना मिस इंडिया पंजाब’चं विजेतेपद मिळवून तिने ‘फेमिना मिस इंडिया’मध्ये भाग घेतला. पण तिला ‘टॉप 12’वरच समाधान मानावं लागलं. यानंतर वर्षभर हरनाझला फारशी उल्लेखनीय कामगिरी करताच आली नाही.

यंदाचं वर्ष मात्र हरनाझसाठी खर्‍या अर्थाने लकी ठरलं. ऑगस्टमधे तिची ‘मिस दिवा युनिव्हर्स 2021’च्या अंतिम 20 स्पर्धकांमधे निवड झाली. तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज परीक्षकांना भावला आणि निर्विवादपणे तिला ‘मिस दिवा युनिव्हर्स 2021’ म्हणून घोषित करण्यात आलं.

‘मिस दिवा युनिव्हर्स 2021’ सारखी प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा जिंकल्याने या वर्षीच्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेसाठी हरनाझला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. 80 स्पर्धकांमधून थेट टॉप 16, टॉप 10 आणि टॉप 5 मध्ये आलेल्या हरनाझसमोर साऊथ आफ्रिका, कोलंबिया, पॅराग्वे आणि फिलिपाईन्समधून आलेल्या सौदर्यवतींचं आव्हान होतं.

फायनलपूर्वी हरनाझला पर्यावरण जनजागृतीबद्दल तिचं मत विचारलं गेलं. यावेळी तिने निसर्गाप्रती मानवजातीच्या बेजबाबदार वर्तनाला जबाबदार ठरवत पर्यावरणाच्या वाढत्या र्‍हासाबद्दल खंत व्यक्‍त केली. भविष्यात भाषणं देत पश्चात्ताप करण्यापेक्षा आता क्रियाशील होऊन निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं तिने सांगितलं.

अंतिम फेरीसाठी साऊथ आफ्रिकेच्या लालेला स्वानी, पॅराग्वेच्या नादिया फेरेएरा आणि हरनाझ यांच्यासमोर ‘आजच्या युवतींना ताणतणाव आणि निर्बंधांवर मात करण्यासाठी काय सल्ला द्याल,’ असा प्रश्‍न करण्यात आला. यावर उत्तर देताना, तरुणाईपुढे सर्वात मोठं आव्हान आत्मविश्वासाचा अभाव असल्याचं हरनाझने सांगितलं.

आपल्या ध्येयासाठी इतरांना जबाबदार ठरवण्यापेक्षा तरुणाईने स्वतःवर विश्वास ठेवायला हवा व तसा प्रयत्न करायला हवा, असं मत तिने मांडलं. मी स्वतःवर विश्वास ठेवला म्हणूनच इथवर मजल मारू शकले, असं म्हणत तिने आपल्या उत्तराचा समारोप केला. हेच उत्तर तिला ‘मिस युनिव्हर्स’ बनवणारं ठरलं.

पर्यावरण आणि तरुणाईपुढच्या आव्हानांना समोर ठेवून दिलेल्या आपल्या उत्तरांमधून हरनाझने परीक्षकांची मनं जिंकली. अंतिम फेरीतला तिचा बेज गाऊन सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तिचा हा आऊटफिट भारताची पहिली ट्रान्सवूमन सैशा शिंदे हिने डिझाईन केला होता.

यावर्षीच्या जानेवारीमध्ये नामांकित फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे याने तो ट्रान्सवूमन असून आपलं नाव आता सैशा शिंदे असल्याचं जाहीर केलं होतं. सैशाने करीना कपूर, अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूरसारख्या अनेक अभिनेत्रींसाठी काम केलं असून 2008ला ‘फॅशन’मध्येही तिच्या डिझाईनचं कौतुक झालं. आता चक्‍क ‘मिस युनिव्हर्स’चा फायनल गाऊन डिझाईन करण्याची कामगिरी तिने केली. भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट होती.

सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्यानंतर हरनाझच्या रूपाने 21 वर्षांनी भारताने विश्वसुंदरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. भारतीय स्त्रियांच्या संस्कृती, सौंदर्य आणि स्वभावमूल्यांचं जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणारी हरनाझ संधू भविष्यातही आपल्या कर्तृत्वाने भारताची मान उंचावेल! अशी खात्री आहे.

– प्रथमेश हळंदे

Back to top button