सातारा : पारगावमध्ये भावकीतल्या ५ जणांनीच केला पाहुण्याचा गेम ! | पुढारी

सातारा : पारगावमध्ये भावकीतल्या ५ जणांनीच केला पाहुण्याचा गेम !

सातारा, पुढारी वृत्तसेवा

प्रशांत पवार (वय २३, रा. अनवडी, ता. वाई) या युवकाचा अपघाती नव्हे तर त्याचा खून झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मारहाण करणारे पारगाव, खंडाळा (जि. सातारा) येथील यादव भावकी असून मृत युवक नात्याने पाहुणा लागत आहे. पोलिसांनी ५ संशयित आरोपींना अटक केली असून त्यातील दोघेजण निवृत्त फौजी आहेत.

हणमंत उर्फ प्रकाश संपत यादव, सचिन नामदेव यादव, अभिषेक उर्फ गौरव शिवाजी यादव, विजय गणपत यादव, कुणाल भानुदास यादव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील हणमंत व सचिन हे निवृत्त फौजी आहेत. याबाबतची माहिती सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. १२ रोजी संशयित आरोपीसह इतरांनी प्रशांत पवार, ओंकार पवार आणि त्यांचे वडील प्रकाश पवार यांना ठिकठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रशांत याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित आरोपींनी जखमी ओंकार व प्रकाश पवार यांनाही जीवे मारण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले. तसेच प्रशांत याचा मृत्यू अपघातात झाला आहे अशी खोटी तक्रार पोलिस ठाण्यात देण्यास भाग पाडले.

घाबरलेल्या ओंकार पवार याने वडिलांचा व स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अपघाताची तक्रार दिली. मात्र पोस्ट मार्टम व पोलिसांची शंका बळवल्याने हा अपघात नसून खून झाल्याचे समोर आले.

या घटनेचा तपास पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, एलसीबी पो.नि. किशोर धुमाळ, पोनि महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलिसांनी केला.

हेही वाचा

Back to top button