कोल्हापूर : बैलगाडी शर्यत शौकिनांचा जल्‍लोष; साडेतीन लाखांना मागितला बैल | पुढारी

कोल्हापूर : बैलगाडी शर्यत शौकिनांचा जल्‍लोष; साडेतीन लाखांना मागितला बैल

कुरूंदवाड (कोल्‍हापूर); पुढारी वृत्‍तसेवा

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिल्याने कुरुंदवाड येथे बैलगाडी शर्यत शौकिनांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. पालिका चौकात शौकिनांनी एकत्रित येऊन जोरदार जयघोष करत आनंद व्यक्त केला.

पेटा या संघटनेने शर्यतीत बैलांना मारहाण करून अमानुष छळ केला जात असल्याचे सांगत शर्यती बंद कराव्यात अशी याचिका 2007 साली मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने 2017 साली शर्यतींवर बंदी घातली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत राज्य सरकारने ही याचिका दाखल केली होती. बंदी उठविण्यासाठी आणि बैलांचा सराव सुरु व्हावा यासाठी काही नियम व अटींसह परवानगी द्यावी, अशी मागणी बैलगाडा संघटना, शर्यतप्रेमी आणि शेतकऱ्यांतून होती. बैलगाडी संघटनांनी बैलगाड्यांसह शासकीय कार्यालयावर मोर्चे काढले होते. या सर्व बाबींचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिली. यामुळे यात्रा, जत्रा, उरुसातील बैलगाडा शर्यतींना पुन्हा मोकळा झाला.

कुरुंदवाडसह परिसरात लवकरच बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पोमाजे यांनी सांगितले. यावेळी सचिन गायकवाड, सोहेब कोठावळे, ओकार मुडशिंगकर, संदीप सनदी, सद्दाम बागवान, आदित्य बिदगे, संतोष पोमाजे, अमृत चोपडे यांच्यासह शर्यत शौकिनांनी जल्लोष साजरा केला.

बैलाला पुन्हा महत्त्व…

आधुनिकतेमुळे शेतातही बैलाची जागा ट्रॅक्टर व यांत्रिक सामग्रीने घेतली होती. त्‍यातच बैलगाडी शर्यतींनाही बंदी घातल्‍याने शौकीन आणि व शेतकरी बैलांचे संगोपन करणे बंद करण्याच्या मार्गावर होते. बैलगाडी शर्यत शौकीन यांची बैले दावणीला बांधून असल्याने त्यांचा खाण्यापिण्याचा खर्चही परवडत नसल्याने ते मेटाकुटीला आले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे बैलाला पुन्हा महत्त्व येणार असल्याने शेतकरी व शर्यत शौकीन त्यांच्यात उत्साह निर्माण झाला आहे.

सर्वोच न्यायालयाच्या निर्णयाने बैलाची किंमत वाढली…

कुरुंदवाड येथील सुरेश बिदगे या बैलगाडी शौकिनाने खिलार जातीचा तयार केलेला खोंडाची (बैल) गेल्या 5 वर्षांपासून त्याचे संगोपन करून त्याचे जतन केले होते. तो त्यांनी विकायला काढला होता. त्याची किंमत ही येणे कठीण होते. त्यांनी त्या बैलाची किंमत दीड लाख रुपये सांगितली होती. तीन शर्यत शौकिनांनी बैलाची पाहणी केली होती. मात्र खरेदी करण्यास उत्साह न दाखवता नकार दिला होता. मात्र सर्वोच न्यायालयाची परवानगी मिळाल्याने त्या शौकिनांनी बिंदगे यांना फोन करून तो बैल साडेतीन लाख रुपयांला मागणी करत बैल आमच्यासाठी राखून ठेवा अॅडव्हान्स पाठवत असल्याचे सांगितले.

Back to top button