कृष्‍णामाईचा अमूल्‍य दागिना झाला लुप्त; १३५ वर्षाचा पूल काळाच्या पडद्याआड | पुढारी

कृष्‍णामाईचा अमूल्‍य दागिना झाला लुप्त; १३५ वर्षाचा पूल काळाच्या पडद्याआड

वाई ; पुढारी वृत्तसेवा

ब्रिटीश कालीन कृष्णा पूल म्हणजे कृष्णामाईच्या गळ्यातील अमूल्य दागिनाच. हाच दागिना आज लुप्त झाला. काळाच्या उदरात तो गडप झाला. पुलाला 135 वर्षे पूर्ण झाली असून, तो आज पाडण्यात आला आहे. या ठिकाणी वाहतुकीसाठी नवा पूल उभारण्यात येणार आहे.

पूल १८८४ साली ब्रिटिशांच्या राजवटीत बांधण्यात आला

वाई शहरामध्ये कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला पूल हा १८८४ साली ब्रिटीशांच्या राजवटीत बांधण्यात आला आहे. या पुलाला १३५ वर्षे पुर्ण झाली आहेत. दरम्यान पुलाला शंभर वर्षे पुर्ण झाल्यानतंर १९८४ साली ब्रिटीश शासनाने महाराष्ट्र शासन व नगरपालिकेला पुलाची मुदत संपल्या बाबतीतचे पत्र पाठविले होते. या पुलावर मोठया प्रमाणावर झाडे-झुडपे उगवली होती. गेली अनेक वर्षे एक नवीन सक्षम पुलाची मागणी केली जात होती. तसेच नागरिकांच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने नवीन पुलाचा आराखडा तयार करून राज्य शासनाकडे पाठवला होता.

पंधरा कोटींचा आराखडा असणारा नवीन पूल मंजूर

पुलाचे शहराच्या दृष्टीने महत्व ओळखून शासनाने पुलाला मंजुरी देऊन नवीन तंत्रज्ञानाने युक्त पंधरा कोटींचा आराखडा असणारा नवीन पूल मंजूर केला. दरम्‍यान आज हा पूल पाडण्यात आला.

वाई शहराच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रची भाग्यरेषा असणारी कृष्णा नदी वाहत आहे. कृष्णा नदी पत्रात सात घाट आणि शेकडो पौराणिक मंदिरे असल्यामुळे वाई शहरास दक्षिण काशी संबोधले जाते. वाई शहराच्या उत्तर- दक्षिण भागास जोडणारा मुख्य पूल म्हणून ज्याची ओळख आहे असा किसनवीर या मुख्य चौकास जोडणारा ब्रिटीश कालीन पूल आहे.

१३५ वर्षे ज्याने अनेक महाप्रचंड पूर झेलत वाईकरांची सेवा

गेली  १३५ वर्षे ज्याने अनेक महाप्रचंड पूर झेलत वाईकरांची सेवा केली. स्वतंत्र्य लढ्याच्या आठवणी, अनेक हिंदी, मराठी चित्रपटाचे चित्रीकरणाचा साक्षीदार अनेक संकटातही न डगमगता वाईच्या दोन्ही भागाचा दुवा बनून खंबीरपणे कृष्णा नदीत आपले मजबूत पाय रोवून उभा राहिला. आपल्या कणखर पाठीवर आनंदाने ओझं वाहत राहिला. जणू कृष्णामाईच्या गळ्यातील अमूल्य दागिना आज काळाच्या उदरात गडप झाला.

नवीन प्रशस्त पूल तयार होत असल्यामुळे वाईकरांमध्ये आनंद असला तरी, गेली अनेक वर्षे ज्यांनी वाईकरांना खंबीर साथ दिली, त्याच्या विषयी वाईकरांचे मन हळवे होताना दिसत आहे. शेवटची आठवण म्हणून अनेकजण पुलावर उभे राहून काल फोटो काढत होते.

काहीजण सेल्फी विथ पूल करत आहेत, तर काहीजण पुलावरून पायी चालून भूतकाळातील आठवणींमध्ये रममाण झाले. अनेकांनी या पुलासोबतच्या आपल्‍या जुण्या आठवणींना सोशल मीडियावर भावूक प्रतिक्रिया दिल्‍या.

Back to top button