सातारा : केटीएम गँगकडून १०३ तोळे सोने जप्त; ५ जणांना अटक | पुढारी

सातारा : केटीएम गँगकडून १०३ तोळे सोने जप्त; ५ जणांना अटक

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पारगाव, खंडाळा, शिरवळ, भुईज, वाई, उंब्रज या भागात के.टी.एम. मोटार सायकलवरून येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला. ५ जणांना अटक करून तब्बल १०३ तोळे सोने, ५० किलो चांदी जप्त केली. सातारा जिल्ह्यातील ही रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरली. दरम्यान, या टोळीने पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली जिल्हयात तसेच कर्नाटक व गुजरात राज्यातही घरफोड्या केल्या आहेत.

सुरदेव सिलोन नानायत (वय ३३, रा. घोटावडे ता. मुळशी), विराध (वय २८, रा. करमळी पो. पीड, ता. मुळशी, जि. पुणे), परदुम सिलोन नानायत (वय २५, रा. पोटाशी, हिपुणे, मुळशी, पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यात घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. एकाच वेळी १५ ते ४० ठिकाणी घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र चोरटे व त्यांनी चिरलेला सोन्याचा ऐवज पोलिसांना मिळत नव्हता. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) हे तपास करत असताना त्यांना के. टी.एम. दुचाकीवरील टोळीने घरफोड्या केल्याचे समजले. सातारा पोलिस त्यानुसार संशयितांचा शोध घेत होते. गेली ३ महिने सातारा पोलीस मागावर असताना त्यांना चोरट्यांची ठोस माहिती मिळाली आणि उचलबांगडी केली. त्यानुसार संशयितांनी चोऱ्यांची कबुली दिली.

पोलिसांनी चोरट्यांकडे अधिक चौकशी केल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यात चोरी केल्याचे सांगितले. तसेच चोरीचे सोने गुजरातमधील सोनार असलेल्या महिलेला विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपासाचा फास आवळला आणि चोरीचे सोने जप्त केले.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.अरुण देवकर, सपोनि रमेश गर्जे, फौजदार विश्वास शिंगाडे, पोलीस शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, अमोल माने, अजित करने यांनी कारवाईत सहभाग घेतला.

हेही वाचा : 

Back to top button