wari 2022 : अपार मिळाले वारकरी रे! | पुढारी

wari 2022 : अपार मिळाले वारकरी रे!

वारकर्‍यांच्या द़ृष्टीने पंढरपूर ही संत नामदेवांची जन्मभूमी, कर्मभूमी व समाधीभूमी आहे. तथापि, काहींच्या मते नरसी नामदेव हे नामदेव महाराजांचे मूळ गाव आणि त्यांची जन्मभूमी. येथेही नामदेव महाराजांचे मंदिर आहे. येथून पालखी पंढरपूरला आषाढीसाठी जाते.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड संत जनाबाईंचे गाव मानण्यात येते. येथे संत जनाबाईंचे मंदिर आहे. येथूनही संत जनाबाईंची पालखी पंढरपूरला जाते. देवगिरीचे जनार्दन स्वामी हे संत एकनाथ महाराजांचे गुरू. त्यांची समाधी देवगिरी किल्ल्यावर आहे. येथून जनार्दन स्वामींची पालखीही पंढरपूरला येते. हा सोहळा ह.भ.प. आनंदे यांनी सुरू केला. देवगिरी, औरंगाबाद, घोगरगाव करकंब, करमाळा, वाखरीमार्गे पालखी पंढरपूरला पोहोचते.

संत तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूंचा अनुग्रह झाला. बाबाजी चैतन्य असे त्यांच्या गुरूंचे नाव होते. या बाबाजींच्या ठिकाणाचा उल्लेख अभंगांमध्ये कुठेही नसला, तरी ओतूर येथे त्यांची समाधी दाखवली जाते. ओतूर येथील त्यांच्या समाधीस्थानावरून पंढरपूरला आषाढी वारीसाठी पालखी जाते. पारनेर, श्रीगोंदा, राशीन, टेंभुर्णी, अरणमार्गे पालखी पंढरपूरला जाते. कर्नाटकातून संत पुरंदरदास यांची पालखी पंढरपूरला येते. पूर्वी काशीवरून कबिरांची पालखीही पंढरपूरला येत असे. तसा उल्लेख न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या एका पुस्तकामध्ये आहे.

देहूजवळीलच सदुंबरे येथे संताजी जगनाडे महाराजांबरोबरच तुकोबांचे आणखी एक टाळकरी गवरशेठ वाणी यांची समाधी आहे. त्यांना वचन दिल्याप्रमाणे तुकोबा त्यांच्या निर्वाणकाळी भेटायला आले होते, अशी आख्यायिका आहे. सदुंबरे येथून गवरशेठ वाणी यांची पालखी ज्येष्ठ वद्य सप्तमीला निघते. संत चोखामेळा यांची बहीण निर्मळा व मेहुणे बंका हेही संत होते. त्यांनी सुद्धा अभंग रचना केली आहे. त्यांचे वास्तव्य बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणपुरा येथे होते. पूर्वी मेहुणपुरावरून संत बंका यांची पालखी पंढरपूरला जात असे. सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथून संत सखुबाईंची पालखी निघते. अंतवडी, रायगाव, म्हासुर्णे चितळी, मायणी, तसरवाडी, झरे दिघंची, शेरेवाडी, वाखरी मार्गे पालखी पंढरपूरला जाते.

सातारा जिल्ह्यातील मेथवडे येथून रामदास स्वामींची तर गोंदवले येथून गोंदवलेकर महाराजांची पालखीसुद्धा आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाते. गाडगेबाबांचे बालपण मूर्तीजापुर तालुक्यातील त्यांच्या मामाच्या गावी गेले. मूर्तीजापूरवरून गाडगेबाबांची पालखी पंढरपूरला येते. याव्यतिरिक्त कोळे येथून घाडगे महाराज, चिंचगाववरून श्री तापकीर बुवा, शिरसावाडीवरून रोकडोबा दादा, सांडेहून बलभीम महाराज, मच्छिंद्र गडावरून श्री मच्छिंद्रनाथ, अमरावती वरून गोमने महाराज, केडगावहून चौरंगीनाथ महाराज, नागपूर वेणीराम महाराज व काशीनंद ब्रह्मचारी, तर अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथून रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरला जाते.

अभय जगताप

Back to top button