सातारा : यवतेश्वर घाटातील 5 टनी दरड हटवली | पुढारी

सातारा : यवतेश्वर घाटातील 5 टनी दरड हटवली

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घटातील धोकादायक दरडी महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त मोहीम राबवून सोमवारी हटवल्या. डोंगरमाथ्यावरील सुमारे 5 टनांहून अधिक वजन असलेल्या दरडींचा सुळका पडून मार्गावर सुमारे 3 फूट खोल खड्डा पडला. जोरदार दणक्यामुळे मार्ग दुभंगला. संरक्षक कठडा तोडून ही दरड दरीमध्ये कोसळली. यवतेश्वरजवळील डोंगरमाथ्यावरील 5-6 दरडी प्रशासनाने सोमवारी हटवल्याने दिलासा मिळाला.

जिल्ह्याच्या पश्चिमेस पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या दोन-चार वर्षांत या भागात अतिवृष्टी होऊन भूस्खलन, जमीन खचणे, दरडी कोसळणे असे प्रकार वाढले आहेत. विशेष: 2019 साली अतिवृष्टी होऊन महापूर आला होता. त्यानंतर 2021 साली जुलै महिन्यात दोन-तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने डोंगरमाथ्यावरील कड्यांचे भाग निसटू लागले आहेत. घाट मार्गावरील झीज झालेले मोठमोठे दगड दरडी बनून मार्गावर कोसळत आहेत. घाटातील कामांसाठी ब्लास्टिंग, ब्रेकरचा वापर झाल्याने रस्त्याकडील भाग ठिसूळ होऊन तो मलबा रस्त्यावर येत आहे.

या दरडींचे उच्चाटन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी यवतेश्वर घाटात मोहीम राबवली. भर पावसात महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सांबरवाडी डोंगराच्या बाजूने चढाई केली. पोकलेनच्या 40 फुटी बकेटच्या सहाय्याने दरडी हटवण्याचे काम सकाळी 10 वाजता सुरू झाले. खाणीजवळ कड्याचा सुटत चाललेला सुळका पॉकलेनच्या सहाय्याने खाली दरीत ढकलून देण्यात आला. सुमारे 5 टनाहून अधिक वजन असलेली ही दरड खाली पडून मार्ग सुमारे 3 फूट खोल खचला. दरडीचा दणका इतका प्रचंड होता की त्यामुळे सुमारे 10-15 फूट मार्ग दुभंगला. ही दरड वेगाने खाली येऊन संरक्षक कठडा तोडून दरीत गेली.

सांबरवाडी डोंगर माथ्यावरील इतर दरडीही दरीत ढकलून देण्यात आल्या. मार्गावर पडून राहिलेल्या दरडी जेसीबीच्या साह्याने हटवण्यात आल्या. छोट्या दरडी पॉकलेनच्या सहाय्याने उचलून डोंगरमाथ्यावर व्यवस्थित ठेवण्यात आल्या. दरडींमुळे सातारा-कास या नव्या मार्गाची व संरक्षक भिंतीची काही ठिकाणी दुरवस्था झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरूस्तीचे कामहाती घेतले आहे. दरडी हटवण्यात येणार असल्याने हा मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवला होता. त्यामुळे सांबरवाडी, यवतेश्वर, कास तसेच बामणोली परिसरातील नागरिकांना एकीव व इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला. या मोहिमेची प्रशासनाकडून पूर्व कल्पना देण्यात आल्याने नागरिकांची फार गैरसोय झाली नाही. दरम्यान, दूरवस्था झालेला रस्ता सिमेंट काँक्रीटच्या सहाय्याने दुरुस्त करण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button