सातारा : कास तलाव ओव्हर फ्लो; पाण्याला भुशी डॅमचा फील | पुढारी

सातारा : कास तलाव ओव्हर फ्लो; पाण्याला भुशी डॅमचा फील

बामणोली; पुढारी वृत्तसेवा : सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सोमवारी सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कास तलाव परिसरात गेली काही दिवस संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अखेर कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. या परिसरात पर्यटन वाढावे, या द़ृष्टिकोनातून सातारा नगरपालिकेने कासच्या सांडव्यावर चांगल्याप्रकारे टप्पे देऊन तेथे पाण्याला भुशी डॅमचा फील दिला आहे.

कास तलाव भरल्याने येथे सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून येणार्‍या पर्यटकांची रेलचेल वाढणार आहे. कास, बामणोली परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच आता कास तलाव भरल्याने या परिसरातील पर्यटन चांगल्या प्रकारे बहरणार आहे. कासच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने येथे आता पर्यटकांची चांगलीच गर्दी वाढणार आहे. कास पुष्प पठारावरून सांडव्याकडे न जाता पर्यटक घाटाई फाट्यावरून घाटाई मार्गे कास सांडव्याकडे पर्यटनास आले तर ते सोयीस्कर ठरणार आहे.

आता कास परिसरात फिरायला जाणार्‍या पर्यटकांना कास नजीकचा सातार्‍याचा भुशी डॅम, भांबवली वजराई धबधबा, मुनावळेचा केदारेश्वर धबधबा, एकीवचा पाबळ धबधबा, बामणोली, शेंबडी, मुनावळे या पर्यटन स्थळी पावसाळी पर्यटनासाठी जाता येणार आहे.
दरम्यान कास तलाव भरल्याने आता सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी तरी मिटली असून यामुळे सातारकरांनी सुस्कारा सोडला आहे.

हेही वाचा : 

Back to top button