सातारा : कोयनेत 24 तासांत 5.18 टीएमसी पाण्याची आवक

सातारा : कोयनेत 24 तासांत 5.18 टीएमसी पाण्याची आवक

पाटण :  दमदार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता धरणातील पाणीसाठा 53.69 टीएमसी इतका झाला होता. हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 51.56 टीएमसी पाण्याची गरज आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे सोमवार सायंकाळपर्यंतच्या 24 तासांत धरणात तब्बल 5.18 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

1 जूनपासून 15 जुलैपर्यंतच्या 45 दिवसांत धरणात केवळ 15.30 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. मात्र त्यानंतर केवळ नऊ दिवसातच धरणात तब्बल 43.62 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणात सोमवार सायंकाळपर्यंत एकूण 53.69 टीएमसी उपलब्ध पाणीसाठ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 48.69 टीएमसी इतका झाला होता. तर रविवार सायंकाळी पाच वाजल्यापासून सोमवार सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या 24 तासांत धरणात तब्बल 5.18 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्याचवेळी धरणात प्रतिसेकंद 59 हजार 977 क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. सोमवार सायंकाळपर्यंतच्या 24 तासात 151 मिलीमीटर, नवजा येथे 191 मिलिमीटर तर महाबळेश्वरमध्ये 156 मिलिमीटर पाऊस झाला होता.

गेल्या काही वर्षांत बदललेले निसर्ग चक्र लक्षात घेता साधारणतः जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यातच अपेक्षित व दमदार पावसाला सुरुवात होते आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने भरते असे दिसून येते. धरण भरल्यानंतर अथवा धरणातील पाणी साठवण क्षमता आणि पडणारा पाऊस पाहून मोठ्या प्रमाणावर कोयना नदीत विनावापर पाणी सोडावे लागते आणि त्यामुळे महापूर येतो. त्यामुळे यावर्षीही तशीच परिस्थिती उद्भवण्याच्या शक्यता गृहीत धरूनच धरण व्यवस्थापनाकडूनही उपाययोजना व नियोजन सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

मागील वर्षीपेक्षा 9 टीएमसी पाणी कमी

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी 100 मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. धरणातील पाणीसाठ्याचा विचार करता मागील वर्षीपेक्षा यंदा 9 टीएमसी पाणी कमी आहे.

पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू…

धरणाच्या पायथा वीजगृहातील 20 मेगॅवॅट क्षमतेचे एक जनित्र सुरू करून वीज निर्मितीनंतर कोयना नदीत प्रतिसेकंद 1 हजार 50 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कराडसह पाटण तालुक्यात पडणारा पाऊस आणि पायथा वीजगृहातून सुरू करण्यात आलेला विसर्ग यामुळेे कोयना नदीसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळेच नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news