सातारा : भूस्खलनग्रस्त 369 कुटुंबांचे स्थलांतर : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी | पुढारी

सातारा : भूस्खलनग्रस्त 369 कुटुंबांचे स्थलांतर : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्याने सध्या ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. पाटण, महाबळेश्वर, जावली, सातारा या तालुक्यांतील 41 धोकादायक व संवेदनशील गावांची पाहणी केल्यानंतर पूरपरिस्थिती व भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर 22 गावांतील 369 कुटुंबांचे निवारा शेडमध्ये स्थलांतर केले आहे. संबंधित धोकादायक गावांतील नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थिती तातडीने मदत व्हावी यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांची 5 पथके स्थापन केली आहेत. धोकादायक गावांतून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांची गुरुवारी पाहणी केली. त्यांनी महसूल अधिकार्‍यांकडून परिस्थितीची व्हीसीद्वारे माहितीही घेतली. त्यानंतर कार्यालयात पत्रकार परिषदेत जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्ह्यात आजअखेर 247.9 मि.मी. पाऊस झाला आहे. कोयना धरणात 74 हजार 569 क्यूसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. जिल्ह्यात 172 पूरप्रवण व 124 दरडप्रवण गावे आहेत. सार्वजनिक विभागामार्फत 6 मार्गांवर व धोकादायक ठिकाणी घाटनिहाय नोडल ऑफिसर नियुक्त केले आहेत. यवतेश्वर तसेच आरे दरे, पोगरवाडी परिसरात कोसळलेल्या दरडी हटवल्या आहेत. कास धरण परिसरात घाटाईदेवी बायपास रस्त्यावर खडी टाकून रस्ता पूर्ववत केला आहे. वाहतूक सुरळीत ठेवली आहे. पुणे एनडीआरएफ जवानांची 25-30 जणांची एक तुकडी शनिवारी दाखल होणार असून ती कराड किंवा पाटण याठिकाणी ठेवण्यात येणार आहे.

संभाव्य पूरपरिस्थिती व भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर बाधितांसाठी पाटण तालुक्यातील जिमनवाडी 7, सावरवाडी 2, म्हारवंड 7, बोरगेवाडी 1, कळंबे 1, भैरेवाडी (डेरवण) 1, बाटेवाडी 1, केंजळवाडी 2, मसुगडेवाडी 4 व पाबळवाडी 1; जावली तालुक्यात घोटेघर-रांजणी 3, धनगरपेढा (मोरघर) 2, नरफदेव (मेरूलिंग)2 तर सातारा तालुक्यातील मोरेवाडी 2, टोळेवाडी (मांडवे) 12 अशी 47 निवारा शेड बांधली आहे. येथे सुमारे 369 कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील मोरेवाडी 18, भैरवगड 60 व सांडवली 20 कुटुंबे; वाई तालुक्यातील जोर 8, गोळेवाडी-गोळेवस्ती 4 कुटुंबे; पाटण तालुक्यातील मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे येथील 150 तर म्हारवंड येथील 35 कुटुंबे; महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतुरबेट, मालूसर, येर्णे येथील 65 कुटुंबे; जावली तालुक्यातील बोंडारवाडी 6, भुतेघर येथील 3 कुटुंबे तसेच नरफदेव, रांजणी व धनगरपेढा याठिकाणी स्थलांतर होण्याबाबत सुचना केल्या आहेत. नागरिकांना त्यांचे नातेवाईकांच्या घरी, शाळा, मंदिर याठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, तरीही नागरिक दुर्लक्ष करत असल्यास सक्तीने स्थलांतर करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, पाटण, महाबळेश्वर, जावली, सातारा या तालुक्यांतील 41 धोकदायक गावे, इतर संवेनशील गावांची पाहणी केली असून स्थलांतरित कुटुंबांची तात्पुरत्या निवार्‍याची व्यवस्था, भोजन, शुद्ध पिण्याचे पाणी आदी मदत तात्काळ मिळावी यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची पाच पथके स्थापन केली असून संबंधित अधिकार्‍यांकडे गावांची देखरेख ठेवली आहे. त्यामध्ये भूसंपादन उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले यांच्याकडे पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फे मरळी खालचे, आंबेघर तर्फे मरळी वरचे, ढोकावळे, हुंबरळी, मिरगाव, डावरी चोपडेवाडी, वरंडेवाडी, काहिर, दिक्षी, खुडूपलेवाडी, मेंढोशी बोर्गेवाडी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती), धनवाडेवाडी/शिंदेवाडी (निगडे), जोशेवाडी (कालगाव), जायगुडेवाडी, कुसावडे (पलसरी) व तालुक्यातील इतर संवेदशनील धोकादायक गावे सोपवली आहेत. जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांच्याकडे महाबळेश्वर तालुक्यातील येरंडल, धावली, दुधोशी, भेकवली वाडी, आचली, कुमठे (कामठवाडी), येर्णे बु॥, येर्णे खुर्द, घावरी, मालुसरे, दरे, चिखली, चतूरबेट, नावली, शिंदोळा व तालुक्यातील इइतर संवेदनशील धोकायदायक गावे सोपवली आहेत. भूसंपादन उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे वाई तालुक्यातील कोंढावळे, जोर व इतर संवेदनशील व धोकादायक गावे आहेत. भूसंपादन उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांच्याकडे जावली तालुक्यातील बोंडारवाडी, भूतेघर, वहिटे व इतर संवेदनशील व धोकादायक गावे आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे सातारा तालुक्यातील सांडवली, केळवली, बोंडारवाडी, भैरवगड (टोळेवाडी), मोरेवाडी व इतर संवेदनशील धोकादायक गावे सोपवली आहेत.

जितेंद्र डुडी म्हणाले, सन 2021 साली झालेल्या सर्व्हेक्षणानंतर 41 गावे दरडप्रवण असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी 19 गावांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा अहवाल जिऑलॉजिकल स्वर्हे ऑफ इंडिया या संस्थेच्या अहवाल स्पष्ट नमूद केले आहे. त्यामध्ये पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी, काहीर, आंबेघर खालचे व वरचे, ढोकावळे, मिरगाव, काटेवाडी-हुंबरळी तसेच सातारा तालुक्यातील भैरवगड या गावांचे पुनर्वसन करण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. पाटणमधील 8 गावांतील 558 कुटुंबासाठी 9 हेक्टर 8 आर क्षेत्र भूसंपादिन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सातारा तालुक्यातील भैरवगडमधील 118 कुटुंबांचे पुनर्वसन सरकारी जागेत करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित गावांच्या पुनर्वसनाची कार्यवाही सुरू आहे. 96 गावांचा सर्व्हे करण्यात येणार आहे.

जितेंद्र डुडी म्हणाले, हुल्लडबाज पर्यटकांना आवरण्यासाठी कास तसेच ठोसेघर मार्गावर पोलिस चौक्या उभ्या केल्या जाणार आहेत. सातारा शहर परिसरातील तीव्र डोंगर उतारावरील गावे, वसाहतींच्या सर्व्हेच्या सुचना केल्या जातील. हवामान खात्याने रेड अर्लट दिल्याने सातारा, महाबळेश्वर, जावली, महाबळेश्वर आणि वाई तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र, आदेशाचे उल्लंघन करून काही ठिकाणी शाळा व महाविद्यालये सुरु ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यामुळे त्याचा अहवाल शिक्षणाधिकार्‍यांकडून मागवण्यात येणार असून संबंधित शाळा व महाविद्यालयांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आदि उपस्थित होते.

आपत्ती नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन केला असून नागरिकांच्या मदतीसाठी (02162) 232349/232175, पोलिस मदतीसाठी (02162) 233833/231181 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा..

अतिवृष्टी, दरडी कोसळणे, भूस्खलनग्रस्त गावांतील नागरिकांनी सतर्क राहून स्वत: सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. नागरिकांनी धोकादायक ठिकाणी प्रवास टाळावा. दरडप्रवण परिसरात थांबू नये. नदी, ओढे-नाले यांच्या पुराच्या पाण्यातून प्रवास टाळावा. पुलावरून पाणी वाहत असताना पाण्याचा प्रवाह ओलांडू नये. पर्यटनाच्या ठिकाणी, धबधबे, तलाव व इतर धोकादायक ठिकाणी प्रवेश करू नये. सेल्फीचा मोह टाळावा. अतिवृष्टीच्या काळात तत्काळ नातेवाईकांच्या सुरक्षित घरी, समाजमंदिर, शाळा इतर ठिकाणी स्वत: स्थलांतरित व्हावे. पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी पाणी उकळून गार करून प्यावे. वीज कडकडत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाण्यात असाल तर तत्काळ बाहेर पडावे. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button