सातारा : केळवलीचा धबधबा ओसंडू लागला | पुढारी

सातारा : केळवलीचा धबधबा ओसंडू लागला

सोमनाथ राऊत : (परळी) ; पुढारी वृत्तसेवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे तेथील धबधब्‍यांचे काय वर्णन करावे, निसर्गाचे चमत्कार पाहायचे असतील तर त्यासाठी निसर्गात रमून जावे लागते. गेल्या आठवडाभरापासून पावसाने सावकाश का असेना पण सुरूवात केली आहे. त्‍याचा बदल निसर्गातही दिसत आहे. डोंगर रांगातले धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. सातारा जिल्‍ह्याच्या परळी खोऱ्यातील केळवली धबधबा ही आता ओसंडून वाहू लागला आहे. शेकडो फुटावरून कोसळणारा हा धबधबा, खाली पाण्याचे तळे आणि मोठमोठ्या दगड धोंड्यातून वाहत जाणारे फेसाळणारे शुभ्र पाणी हा निसर्गाचा अविष्कार मन मोहवून टाकतो.

या पाण्यातून आसमंतात उडणारे तुषार धबधब्‍यापर्यंत जाण्याआधीच आपल्‍याला चिंब भिजवून टाकतात. हिरव्यागार झाडाझुडपातून आणि दगडाच्या कडी कपारीतून उंचच उंच दुधाच्या धारा जणू जमिनीवर पडत असल्याप्रमाणे पांढराशुभ्र पाण्याचा स्त्रोत वाहू लागला आहे. हा निसर्ग अनुभवायचा असेल तर या परिसरात गेलंच पाहिजे.

परळी खोऱ्यात डोंगरदर्‍यातून सध्या पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे कधी पाऊस तर कधी उन्ह आणि त्यातून मधूनच येणारे दाट धूके यामुळे हा परिसर विलोभनीय वाटू लागला आहे.

कसे जाल…

सातारा शहरातून व बोगद्यातून परळी, परळीतून नीत्रळ केळवली इथपर्यंत वाहनाने जायचे. तिथून सुमारे दोन किलोमीटर चालत केळवलीचा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. जाताना उरमोडी धरणाचे विहंगम दृश्य तसेच पायवाटेने जाताना हिरवेगार डोंगर पक्षांचा किलबिलाट हे सर्व पाहताना निसर्गाचा साक्षात्कार होतो.

हेही वाचा : 

Back to top button