कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये संचलन | पुढारी

कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये संचलन

कराड; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात बुधवारी (दि.७) सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दरम्यान, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शहरातून संचलन केले.

कोल्हापूर येथे औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि हे स्टेटस सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने संतप्त पडसाद कोल्हापूर शहरात उमटले. मंगळवारी (दि.६) सकाळपासूनच कोल्हापूर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. दरम्यान, कोल्हापूर बंदची हाक देवू नये असे आवाहन करण्यात आले होते. तरीही कोल्हापुरात मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला. यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.

या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तणावाचे लोन कराडमध्ये येऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली. डीवायएसपी अमोल ठाकूर, डीवायएसपी बी.आर.पाटील यांनी मंगळवारी (दि.६) सकाळपासूनच शहरातील प्रमुख ठिकाणी बंदोबस्त वाढवला होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत कराड शहरातून संचलन करण्यात आले.

यावेळी समीर शेख संचलनामध्ये सर्वात पुढे सहभागी झाले होते. त्यांच्याबरोबर डीवायएसपी अमोल ठाकूर, डीवायएसपी बी. आर. पाटील, पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे, सपोनि सरोजिनी पाटील यांच्यासह कराड शहर व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस जीप, व्हॅन सहभागी झाल्या होत्या. दत्त चौकातून पोलीस संचलनाला सुरुवात झाली. पोलीस जीपवरील सायरन वाजवत हे संचलन मुख्य बाजारपेठेतून करण्यात आले.

हेही वाचा;

Back to top button