Karad Crime : डिलीव्हरी बॉयची फसवणूक; आंतरराज्य टोळी गजाआड | पुढारी

Karad Crime : डिलीव्हरी बॉयची फसवणूक; आंतरराज्य टोळी गजाआड

कराड : पुढारी वृत्तसेवा

कुरिअर डिलिव्हरी बॉयची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या कराड शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाई करत पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ( Karad Crime )

रॉबिन ॲन्थोनी आरोजा (वय 26, मुळ रा. कुचेकल, कोचीन, केरळ सध्या रा. बदलापूर, जि. ठाणे), किरण अमृत बनसोडे (वय 24, कल्याण पुर्व), राहूल मच्छिंद्र राठोड (वय 21, रा. बदलापूर), रॉकी दिनेश कर्णे (वय 21, कल्याण जि. ठाणे), गणेश ब्रम्हदेव तिवारी (वय 39, रा. घाटकोपर, मुंबई) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अभिजीत नितीन मोहीते यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ( Karad Crime )

याबाबत पोलिसांनी सांगितले की, वरील संशयितांनी 4 सप्टेंबर रोजी कराड शहरात एकूण 5 ठिकाणी मोबाईलची ऑर्डर मागवली. ऑर्डर स्वीकारताना अर्धे सुट्टे पैस देवून कुरीअर डिलीव्हरी बॉय यांना पैसे मोजण्यात व्यस्त ठेवून ॲमेझॉन पार्सल मधील ऑर्डरचे मोबाईल हातचलाखीने काढून घेतले. त्यानंतर त्याठिकाणी रिन साबण, व्हिल साबण, पार्ले बिस्कीटचे पुडे रिकाम्या बॉक्समध्ये ठेऊन फसवणूक केली. संशयितांनी पार्सल मागवण्याकरीता स्वत:चे बोगस पत्ते व बोगस सीमकार्डचा वापर केल्याचे तपासातून निष्पन्न झाले. सदरचा गुन्हा उघड करणे व संशयितांना पकडणे हे कराड पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

तांत्रिक माहिती घेत असताना यामध्ये मोठी टोळी कार्यरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. या गुन्ह्याचा तपास करत असताना विविध तपास कौशल्यांचा वापर करून कराडच्या डीबी पथकाने 5 संशयित निष्पन्न केले. त्यांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांनी पोलीस पथके पाठवून बदलापूर , कल्याण, ठाणे येथून ताब्यात घेतले. संशयितांना कराडमध्ये आणल्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांकडून 2 कार, 1 लॅपटॉप, 8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधारकार्ड व फसवणूकीकरता वापरण्यात येणारे साहित्य असा सुमारे 5 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक अजीत बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित बाबर, सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलिस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, पोलिस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, मारूती लाटणे, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी ही कारवाई केली. अधिक तपास सपोनि अमित बाबर करीत आहेत.

संशयितांनी गुगलवरून केली आधारकार्ड डाऊनलोड…

संशयितांनी प्रथम गुगलवरून आधारकार्ड डाऊनलोड करून ते मोबाईलवर ईडीट करत बोगस आधारकार्ड बनविल्याचे सांगितले. त्यानंतर त्या आधारकार्डचा वापर करून बोगस सिमकार्ड खरेदी केली. त्या सीमकार्डचा वापर करून ॲमेझॉन, फ्लिपकार्ड, रेडमी, विवो स्टोअरवर खाती सुरू करून त्या खात्यांवरून ऑनलाईन ऑर्डर मागवत होते. असा ऑर्डर केलेला मोबाईल मेसेज आल्यानंतर संबंधीत डिलेव्हर बॉयला सुट्टे पैसे मोजण्यास देवून हातचलाखी करून मुळ पार्सलमधील मोबाईल काढून घेवून त्यामध्ये साबणाचा बॉक्स टाकण्यात येत होता.

टोळीचे पुढील टार्गेट उरळीकांचन पुणे होते…

संशयितांनी या गुन्ह्यासह महाराष्ट्रात पुणे, कल्याण-ठाणे, दादर-मुंबई, नंदुरबार, अलिबाग-रायगड जिल्ह्यात व इतर राज्यात इंदौर-मध्यप्रदेश, भोपाळ-मध्यप्रदेश, कन्नुर-केरळ, गोवा याठिकाणीही असे प्रकार गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. कुरियर डिलिव्हरी बॉयची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीमध्ये काहीजण उच्चशिक्षित आहेत. ते त्यांना असलेल्या तांत्रिक ज्ञानाच्या वापर करून फसवणूकीचे प्रकार करत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या टोळीचे पुढील टार्गेट उरळीकांचन, पुणे होते. तेथेही मोबाईलची पार्सल मागविले होते. परंतु, त्यापुर्वीच कराड पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

Back to top button