Udayanraje Bhonsle | दिल्लीत छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, उदयनराजेंनी अमित शहांची भेट घेत केली मागणी | पुढारी

Udayanraje Bhonsle | दिल्लीत छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, उदयनराजेंनी अमित शहांची भेट घेत केली मागणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा; छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांचे चरित्र व कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे छ. शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेत केली.

छ. शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित केले जावे, असेही उदयनराजेंनी अमित शहा यांना सांगितले. छ. शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा करणे गरजेचे आहे, असा मुद्दा खा. उदयनराजे भोसले यांनी मांडला. यावर कायदेतज्ज्ञ तसेच अभ्यासकांशी चर्चा करु, असे आश्वासन शहा यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे परदेशातील विविध संग्रहालयातून भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय स्मारक फार गरजेचे आहे, असे खा. भोसले म्हणाले.

छ. शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या धोरणाला काही प्रवृत्ती सुरुंग लावत आहे. त्यातून महाराजांचा अवमान होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंड रुपाने तसेच विविध भाषांमध्ये प्रकाशित करावा. हे काम गुणवत्तेच्या आधारावर झाले तर इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नाला आळा बसेल तसेच सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, असेही खा. भोसले यांनी शहा यांना सांगितले.

हे ही वाचा :

Back to top button