भाजप जगात एक नंबरचा पक्ष : खा. उदयनराजे | पुढारी

भाजप जगात एक नंबरचा पक्ष : खा. उदयनराजे

भिलार / पाचगणी;  पुढारी वृत्तसेवा :  सुरुवातीपासून सत्तेत असणार्‍या राष्ट्रीय पक्ष काँग्रेससह सर्वच विरोधकांची आजची परिस्थिती काय झाली आहे हे आपण पाहतोय. अलीकडच्या काळात भाजपने भरारी घेत देशात नव्हे जगात एक नंबरचा पक्ष म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. या शिबिरातून कार्यकर्त्यांनी स्वबळावर उभे राहण्याची प्रेरणा आणि सक्षम बनण्याचा मंत्र घेवून जावे, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले तर सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणारच, अशी गर्जना जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी केली.

भिलार, ता. महाबळेश्वर येथील जन्नीमाता मंदिर सभागृहात सातारा जिल्हा भाजपा कार्यकारिणीची बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराला शनिवारी प्रारंभ झाला. यावेळी खा. उदयनराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, माजी आमदार मदनदादा भोसले, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटस्कर, दत्ता थोरात, सुवर्णा पाटील, रामकृष्ण वेताळ, अविनाश फरांदे, डॉ. सौ. सुरभी चव्हाण-भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. उदयनराजे पुढे म्हणाले, आपल्या देशात असणारा शेतकरीवर्ग सधन झाला तरच व्यवसाय चालणार आहेत. त्यातून आपल्या शासनाच्या विविध योजना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. जास्तीत जास्त लोक पक्षाशी जोडण्याचे काम केले जाईल.

आ. जयकुमार गोरे यांनी घणाघाती भाषण केले. ते म्हणाले, सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल तेव्हाच आपण जिल्ह्यात एक नंबर ठरलो, असे मी समजेन. त्यासाठी आपण आजपासून कामाला लागू. कोणत्याही परिस्थितीत झेडपीवर भाजपाचा झेंडा फडकावणारच, असा निर्धार त्यांनी केला. अंगणवाडीसेविका, आशा यांना आमच्या सरकारनं मानधन वाढवून दिले. याचा विरोधकांना आनंद वाटत नाही, अडीच वर्षात त्यांना निर्णय घेता आले नाहीत पण जेव्हा आमच्या सरकारने मानधन वाढवलं तेव्हा आणखी जास्त करायला पाहिजे होतं, असा डांगोरा विरोधक पिटत आहेत. केवळ तीन चार वेळा मंत्रालयात जाणारा, शेतकर्‍यांचे प्रश्न माहीत नसलेला मुख्यमंत्री देशात पाचव्या नंबरला येतो ही मीडिया मॅनेजमेंटची किमया असल्याचा टोलाही आ. गोरे यांनी उद्घव ठाकरे यांना लगावला.
नरेंद्र पाटील म्हणाले, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीसाठी आपण तयारी केली आहे का? याचे आपण सर्वांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. आगामी काळात आपल्याला फक्त लढायचे नाही तर जिंकायचे आहे हाच निर्धार करून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

यावेळी चाकोरीबाहेर जावून समाजात काहीतरी वेगळं काम करणार्‍या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. दरम्यान, उद्या या शिबिरात विविध मान्यवरांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन होणार आहे. दरम्यान, महिला आणि शेतकर्‍याला ताकदवान बनवणारा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला.

Back to top button