जत ; माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणी चौघांना अटक; संशयित सूत्रधार सावंत फरार | पुढारी

जत ; माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणी चौघांना अटक; संशयित सूत्रधार सावंत फरार

सांगली ; पुढारी वृत्तसेवा जत येथील माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खूनामागचे खरे सूत्रधार माजी नगरसेवक उमेश सावंत असल्‍याचे समोर आले आहे. त्यांनी सुपारी देऊन खून केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी चौंघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. मात्र सावंत हे फरार आहेत. त्यांना ही लवकर अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान अटक केलेल्या संशयितांमध्ये बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण (वय 27, रा, समर्थ कॉलनी जत) निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने (27, रा. मौजे डिग्रज) आकाश सुधाकर वनखंडे (वय 24, रा, के.म हायस्कूल जवळ, जत ) व किरण विठ्ठल चव्हाण (वय 27, आर आर कॉलेज जवळ जत) अशी नावे आहेत.

डॉ तेली यांनी दिलेल्‍या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ताड हे मुलास शाळेतून घरी आणण्यासाठी जात होते. यावेळी बबलू चव्हाण व त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन पिस्तुलाने गोळीबार करून व दगडाने ठेचून ताड यांचा खून केला. याबाबत तपास करत असताना हा खून चव्हाण व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर या चौघाही संशयीतांना गोकाक येथून ताब्यात घेऊन अटक केली.

त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उमेश सावंत यांच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान हा खून कोणत्या कारणातून झाला त्याचा तपास सुरू आहे. पैशाची सुपारी घेऊन खून केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button