सातारा : नाताळ अन् नववर्षाच्या स्‍वागतासाठी पाचगणी, महाबळेश्वर सज्‍ज | पुढारी

सातारा : नाताळ अन् नववर्षाच्या स्‍वागतासाठी पाचगणी, महाबळेश्वर सज्‍ज

पाचगणी ; पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी महाबळेश्वरमध्ये नाताळ सणाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. चौका, चौकामध्ये आणि हॉटेलमध्ये नाताळची आकर्षक सजावट करण्यात आली असून, विद्युत रोषणाईने पाचगणी, महाबळेश्वर सज्ज आहे.

नाताळच्या निमित्त महाबळेश्‍वरच्या बाजारपेठेत शनिवार, रविवार मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली आहे.  नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत व हॉटेलमध्ये सजवलेल्या देखाव्यां बरोबर सेल्फी काढण्याचा आनंद पर्यटक लुटताना दिसत आहेत.

नाताळ बाबांबरोबर पाचगणी मार्केटमध्ये छोटा भीम व चुटकी देखील आहेत. या कार्टून पात्रांमुळे बच्चे कंपनी जाम खूश आहे. मेरी ख्रिसमस…! नाताळच्या स्वागताला महाबळेश्वर, पाचगणीचे सर्व हॉटेल्‍स व स्थानिक सज्ज झाले आहेत. यंदाचा हंगाम जल्लोषात साजरा होत असून, नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरमध्ये लाखो पर्यटक दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या कृषी पर्यटन केंद्र हाऊसफुल्‍ल झाली आहेत.

स्थानिकांकडून पर्यटकांचं उत्‍साहात स्‍वागत करण्यात येत आहे. ख्रिश्‍चन धर्मियांचा नाताळ हा पवित्र सण मानला जातो. नाताळ सणाच्या निमित्ताने अनेक हॉटेल्समध्ये नाताळबाबाची प्रतिकृती पहावयास मिळत आहे. नाताळबाबा येताना आपल्या पाठीवरील पोतडीत खाऊ आणतात व सर्वांना ते खाऊ वाटतात अशी आख्यायिका सांगितली जाते. येथील सर्व हॉटेल चालक-मालकांच्या वतीने दरवर्षी नाताळाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवलेले जातात.

याही वर्षी नाताळ सणाच्या निमित्ताने विविध उपक्रम पहावयास मिळत आहेत. दोन वर्षाच्या कालावधीनंतर पाचगणी, महाबळेश्वरमध्ये नाताळ सण आणि नवीन वर्षाची सुरुवात यासाठी मोठ्या प्रमाणात उत्साह पहावयास मिळत आहे. पाचगणी, महाबळेश्वरच्या दोन्हीही बाजारपेठा मार्केट व सर्वच पॉईंट्स पर्यटन स्थळे हाऊसफुल्‍ल दिसत असल्याने पर्यटनाची रौनक वाढली आहे.

पर्यावरण : आव्हान ई-कचर्‍याचे

Tunisha Sharma Case : मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी ‘का’ संपवत आहेत जीवन?

Back to top button