किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतलं ताब्यात | पुढारी

किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतलं ताब्यात

कराड; पुढारी वृत्तसेवा : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कोल्हापूरला पुरावे गोळा करण्यासाठी निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज (सोमवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड पोलिसांनी कराड रेल्वे स्थानक परिसरात ताब्यात घेतले. कोल्हापूर व सातारा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई करत किरीट सोमय्या यांना अटक केली.

मुंबईवरुन सोमय्या कोल्हापूरला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसने निघाले असता, त्यांना मुंबईपासून पोलिसांनी फाॅलोअप केला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून सोमय्या यांनी कोल्हापूरला जाऊ नये असे आवाहन पोलिसांनी त्‍यांना केल्यानंतर ते कराडला थांबण्यास तयार झाले.

कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणेपाच वाजता भाजप नेते माजी खासदार सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराड रेल्वे स्थानक ओगलेवाडी येथे उतरले. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली.

दरम्यान, सोमय्या हे कराड येथील शासकीय विश्रामगृहात थांबले असून सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

Back to top button