सातार्‍यात 'लव्ह जिहाद'विरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा | पुढारी

सातार्‍यात 'लव्ह जिहाद'विरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा

सातारा, पुढारी वृत्तसेवा : लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी रविवारी (दि.४) हिंदू समाज सातारा जिल्ह्याच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हिंदू धर्म रक्षणासाठी विविध हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत राजवाडा येथून विराट मोर्चास प्रारंभ झाला. गोलबाग, मोती चौक, राजपथ, पोलीस मुख्यालय, पोवईनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेव अशा विविध घोषणांनी मोर्चा मार्ग दणाणून सोडला होता.

 लव्ह जिहाद रोखण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा. धर्मातरण बंदी, गोवंश हत्या बंदी कायदा आधिक बळकट करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी. महिला सुरक्षेसाठी आवश्यक ते कायदे बनवावेत. हिंदुचे श्रध्दास्थान महापुरूष यांच्याबाबत अपशब्द वापरणार्‍या, त्यांचा अपमान करणार्‍या व्यक्तींवर त्वरित गुन्हा दाखल होवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला द्यावेत यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विविध संघटनाचे पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.

मोर्चात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ.महेश शिंदे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, संदीप शिंदे, पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गणेश मेळावणे, दत्ताजी थोरात, सुरभी भोसले, विकास गोसावी, राहुल शिवनामे, प्रशांत नलावडे, विनायक थत्ते यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button