सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दशकामध्ये वाळूच्या राजकारणाने कराड तालुका ढवळून निघाला असताना चार वर्षांपासून मात्र ही परिस्थिती बदलली आहे. कराडचा वाळू चोरीचा केंद्रबिंदू सरकून त्याऐवजी दहिवडी उपविभागाची हवा बनली आहे. वाळू अधिक असल्याने चोरीसाठी हाच नवा अड्डा बनला आहे. दरम्यान, गेल्या 4 वर्षांमध्ये केवळ दहिवडी परिसरातच 94 गुन्हे दाखल झाले आहेत.
चार वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यात वाळू चोरी प्रकरणी 350 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये 620 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वाळू अड्ड्यांवर कारवाई केल्यानंतर पोलिस व महसूल प्रशासन तेथून जेसीबी, डंपर, ट्रक, ट्रॅक्टर व वाळू जप्त करतात. त्याची रक्कम सुमारे 26 कोटी रुपयांपर्यंत झाली आहे. प्रशासनाकडून कारवाई होत असताना यामध्ये शिक्षा लागलेले मात्र ऐकीवात नाही. अशातच आता पुन्हा वाळू लिलाव प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. यामुळे वाळूची चोरी व त्यातून होणारी मुजोरी आवरण्यासाठी पोलिसांना अॅक्शन प्लॅन तयार करावा लागणार आहे.
गुन्हेगारी जगतात वाळूला काळे सोने म्हणून ओळखले जाते. लिलाव घ्यायचे आणि बेसुमार वाळू उपसायची, असा उद्योग राजरोसपणे चालत आहे. वाळू लिलावातून गुन्हेगारांमध्ये वॉर होण्याचे प्रसंगही घडले आहेत. वाळू तस्करी आणि कराड असे जणू समीकरणही झाले होते. आता मात्र हीच वाळू व तिची होणारी चोरी दहिवडी उपविभागात सरकल्याचे वास्तव आहे. वाळूतून निर्माण होणारी गुन्हेगारी. सर्वात महत्वाचे निसर्गाचे तोडले जाणारे लचके रोखण्यासाठी पोलिसांना भविष्यात अधिक प्रभावी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वडूज, म्हसवड, औंध, दहिवडी रडारवर…
दहिवडी उपविभागात दहिवडी, वडूज, म्हसवड व औंध ही चार पोलिस ठाणी येतात. 2019 ते 2022 या चार वर्षाच्या कालावधीत या चार पोलिस ठाण्यांतर्गत तब्बल 94 गुन्हे दाखल झाले आहेत. हे प्रमाण जिल्ह्यातील इतर उपविभागामध्ये सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, गेल्या अडीच वर्षापासून वाळू लिलाव बंद आहे. तसेच लॉकडाऊन व पोलिस अधिकार्यांच्या वारंवार होणार्या बदल्या यामुळे वाळू कारवाईवरील प्रमाण तुलनेत कमी झाले आहेत. याशिवाय क्रशर सॅन्ड हा वाळूला पर्याय निर्माण झाला आहे. मात्र असे असतानाही छुप्या पध्दतीने काही प्रमाणात वाळू चोरी होत आहे.
हे ही वाचा