पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमध्ये माध्यान्ह भोजनातील शोलय पोषण आहारातील खिचडीमधून चक्क विद्यार्थ्यांच्या ताटात अळ्या आढळल्या आहेत, अशी तक्रार मनपाच्या काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली आहे. मात्र, शालेय पोषण आहार पुरविणार्या संस्थेबाबत वारंवार नोटीस देऊनही शिक्षण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही.
मनपा शाळांधील सुमारे 40 ते 45 हजार विद्यार्थ्यांना शासकीय अनुदानातून हा शालेय पोषण आहार पुरविला जातो. पालिका शिक्षण विभागाने एकूण 21 खासगी संस्थांना हा शालेय पोषण आहार पुरविण्याचे काम दिले आहे. यामध्ये अन्नामृत फाउंडेशन या इस्कॉन मंदिराच्या संस्थेकडून सर्वाधिक 19 हजार 100 विद्यार्थ्यांना आहार पुरविला जातो. मात्र, उर्वरित आहार पुरविण्याचे काम बचत गट व महिला स्वयंरोजगार संस्थांना दिले आहे. यात बहुतांशी राजकीय संबधातील संस्था आहेत.
पालिका शाळांमधील हे गंभीर वास्तव असताना वारंवार नोटिसा देवूनही या विभागाच्या उपायुक्तांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शिक्षण विभाग एकप्रकारे अळ्या असलेला शालेय पोषण आहार पुरविणार्या संस्थांना पाठिशी घालतोय का, असा प्रश्न निर्माण होत आहे.शालेय पोषण आहाराबाबत 25 ऑगस्ट 2022 ला पहिली तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर अनेक तक्रारी आल्या. शाळांच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारींमुळे सावित्री महिला स्वयंरोजगार नावाच्या संस्थेकडून पुरविलेल्या भातात चक्क केस, आळ्यां आढळून आल्याची गंभीर बाब समोर आली. याच संस्थेच्या पोषण आहाराबाबत वेगवेगळ्या सात शाळांमधून तक्रारी प्राप्त झाल्या. तरी देखील शिक्षण विभाग आणि या विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यांनी दिलेल्या नोटिसांना देखील संबधित संस्थेने जुमानले नाही.
त्यामुळे उपायुक्त खोत यांनी कामकाजात कसूर केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार साामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहेे. शाळा प्रशासनाकडून शालेय पोषण आहारात सापडलेल्या अळ्यांची तक्रार करुन त्याचे सॅम्पल पुराव्यासाठी काढून ठेवण्यात आले.
मात्र, शिक्षण विभागाने वेळेत सॅम्पल न नेल्यामुळे त्यास बुरशी आली. त्यामुळे पुराव्याचे सॅम्पल नाईलाजास्त टाकून देण्यात आले असे मुख्याध्यापकाने सांगितले.