औषधांच्या निर्यातीत 138 टक्क्यांनी वाढ : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती | पुढारी

औषधांच्या निर्यातीत 138 टक्क्यांनी वाढ : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  मागील आठ वर्षांच्या कालावधीत औषधांच्या निर्यातीत 138 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी आज ( दि.२३) सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. वर्ष २०१३-१४ मध्ये देशातून 37 हजार 988 कोटी रुपयांच्या औषधांची निर्यात झाली होती, त्या तुलनेत वर्ष २०२१-२२ मध्ये 90 हजार 324 कोटी रुपयांच्या औषधांची निर्यात झाली आहे.

20 टक्के जेनेरिक औषधांचा पुरवठा भारतातून

औषध निर्यातीच्या क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण होत असल्याचे सांगून मंडाविया पुढे म्हणतात की, ‘वन अर्थ, वन हेल्थ‘ दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून भारत जगातील बहुतांश देशांना औषधांचा पुरवठा करीत आहे. केवळ औषधेच नव्हे तर कोरोना नियंत्रणासाठीच्या लसींसह इतर लसींचा पुरवठा विविध देशांना केला जात आहे. चांगला दर्जा आणि परवडणाऱ्या किंमती यामुळे मागील काही वर्षांत भारतीय औषधांच्या मागणीत वाढ झालेली आहे. गेल्या मे महिन्याची आकडेवारी पाहिली तर जगाला पुरवठा होत असलेल्या 80 टक्के लसींचा व 20 टक्के जेनेरिक औषधांचा पुरवठा भारतातून केला जात आहे.

एकूण निर्यात 5.92 टक्के औषधांचा समावेश

देशातून एकूण निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तुंचा विचार केला तर 5.92 टक्के औषधांचा त्यात समावेश आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या प्रगतशील क्षेत्रांमध्ये भारतीय औषधांची स्वीकाहार्यता वाढली आहे. कोरोना संकटाच्या काळात लॉकडाउन, पुरवठा साखळीतील अडथळे आदी समस्या होत्या; पण तरीही त्या काळात देशातून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात झाली होती, असेही मंडाविया यांनी सांगितले आहे.

हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button