Heavy Rainfall : राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस

Heavy Rainfall : राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : Heavy Rainfall : राज्यात तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणखी किमान दोन दिवस कायम राहणार आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या कालावधीत कोकणाच्या काही भागांत अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

15 सप्टेंबरपासून पावसाचा जोर मंदावणार असून, 16 पासून उघडीप राहील. त्यानंतर 18 ते 19 सप्टेंबरपासून पाऊस पुन्हा जोर पकडण्याची शक्यता आहे.

राज्यात तीन ते चार दिवसांपासून सर्वदूर पाऊस होत आहे. कोकणात काही भागांत विशेषत: रायगड, मुंबई, पालघर, ठाणे व रत्नागिरी या जिल्ह्यांतील काही भागांत अतिवृष्टी, तर उर्वरित भागात मुसळधार पाऊस होत आहे.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर आहे. तर नाशिक भागातही पाऊस वाढला आहे. मराठवाड्यातील बहुतांश भाग आणि विदर्भात पाऊस जोरात आहे.

अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार ओडिशाच्या किनारपट्टीवरील उत्तर भागाकडे तयार झालेले अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाच्या अंतर्गत असलेल्या उत्तरेकडे सरकले आहे.

सध्या हे क्षेत्र दक्षिण-पूर्व ओडिशाच्या किनोजहारागडपासून 50 किलोमीटर तर चंदबेलीपासून 100 कीलोमीटरवर आहे. पुढील 48 तासांत या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन ते उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश पार करणार आहे. त्यानंतरच्या 12 तासात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होईल.

याबरोबरच दक्षिण गुजरात आणि आसपास भागावरदेखील गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र कायम असून त्याची तीव्रता पुढील दोन दिवस राहणार आहे. यामुळे मुंबई व कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर राहणार आहे.

'या' भागात ऑरेंज अलर्ट (14 आणि 15 सप्टेंबर)

ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर (घाटमाथा)

यलो अलर्ट असलेली ठिकाणे (14 आणि 15 सप्टेंबर)

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, भंडारा, नागपूर, वाशिम, यवतमाळ

पुढील दोन दिवसांत तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई, पालघर, कोकण, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याबरोबरच नाशिक भागात मुसळधार पाऊस बरसणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

15 सप्टेंबरपासून पाऊस कमी होईल, मात्र पुन्हा 18 किंवा 19 पासून राज्यात पुन्हा पाऊस वाढणार आहे.
– अनुपम कश्यपि (संचालक, पुणे वेधशाळा)

मान्सूनचा परतीचा प्रवास लांबतोय

वास्तविक पाहता एक सप्टेंबरपासून राजस्थानच्या पश्‍चिम भागातून मान्सून परतीचा प्रवास करीत असतो. मात्र, मागील तीन ते चार वर्षांपासून मान्सूनचा परतीचा प्रवास लांबत चालला आहे. यावर्षी सष्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. या परतीच्या प्रवासामुळे राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात 24 तासांत झालेला पाऊस (मिमीमध्ये)

कोकण : बेलापूर-140, राजापूर-130, हरणाई, मोखोडा- 1000, जव्हार, कल्याण- 90, सांगे- 80, ठाणे- 60, सावतंवाडी, डहाणू, अलिबाग, पेण, संगमेश्‍वर, देवरूख, विक्रमगड- 60,

मध्यमहाराष्ट्र : गगनबावडा-150, महाबळेश्‍वर – 100, इगतपुरी- 90, भोर, लोणावळा- 70, र्त्यंबकेश्‍वर- 60, राधानगरी- 50,

मराठवाडा : नांदेड- 40, पूर्णा- 30, औरंगाबाद- 20,

विदर्भ : सालकेस- 80, आमगाव- 50, धानोरा, गोंदिया- 50

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news