पुणे : मुख्यमंत्र्यांचे गुजरातपुढे काही चालत नाही : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील | पुढारी

पुणे : मुख्यमंत्र्यांचे गुजरातपुढे काही चालत नाही : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सध्याच्या राज्य सरकारचा आत्मविश्वास कमी झाला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे गुजरातपुढे हतबल झाले आहेत. त्यांचे गुजरातसमोर काही चालत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी केली.
राज्यातील पोलिस भरती रद्द केल्याच्या, तसेच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर आंदोलन करण्यात आले, त्या वेळी पाटील पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, महाविकास आघाडीने नोकर भरतीची तयारी केली होती. त्याचा निर्णय घेतला होता. तेच आता सध्या राज्य सरकार जाहीर करीत आहे. 75 हजार जणांना नोकरी देत असल्याची जाहिरात त्यांनी केली. त्याऐवजी फॉक्सॉनचे मालक अनिल आगरवाल यांना भेटून व तो प्रकल्प महाराष्ट्रात आणला असता, तर लाखो तरुणांना नोकरी मिळाली असती.

आंदोलनाच्या ठिकाणी भाषण करताना पाटील म्हणाले, राज्यात नव्या शिंदे-फडणवीस सरकारने तरुणांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला आहे. कोणताही नवीन प्रकल्प त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मागण्याची इच्छाशक्ती या सरकारमध्ये नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेले प्रकल्प देखील यांना टिकवता आलेले नाहीत. त्यामुळे खासगी क्षेत्रातील नोकर्‍या अडचणीत सापडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली पोलिस भरती देखील या सरकारने स्थगित करून तरुणांच्या शासकीय नोकर्‍यांचा मार्ग देखील बिकट केला आहे.

पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भाषण या वेळी झाले. शिंदे-फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी, करतात गुजरातची चाकरी, द्या आमच्या रोजगाराची हमी, बंद करा गुजरातची गुलामी, पन्नास खोके महाराष्ट्राला धोके, अशा घोषणांनी या वेळी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. आंदोलन प्रसंगी प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, श्रीहरी दबडे, बापू डाकले, संगीता बराटे यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Back to top button