मिसेस मुख्यमंत्र्यांना सोसावा लागला वाहतूक कोंडीचा त्रास; वेण्णालेक परिसरात ट्रॅफीक जाम | पुढारी

मिसेस मुख्यमंत्र्यांना सोसावा लागला वाहतूक कोंडीचा त्रास; वेण्णालेक परिसरात ट्रॅफीक जाम

महाबळेश्वर: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर पर्यटन स्थळ दिवाळी हंगामामुळे फुलले असून देशविदेशातील पर्यटक येथे पर्यटनास येत आहेत. मात्र, प्रत्येक हंगामामध्ये होणारी वाहतूक कोंडीची समस्या ”जैसे थे”च असून आज चक्क राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांना वेण्णालेक व परिसरातील वाहतूक कोंडीत तब्बल दीड तास अडकून पडावे लागले. अखेर दीड तासांनंतर त्यांची या वाहतूक कोंडीतून सुटका झाली. मिसेस मुख्यमंत्र्यांनाच जर अडकून पडावे लागत असेल, तर स्थानिकांसह पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांना याचा किती त्रास सहन करावा लागत असेल. याचा विचार न केलेलाच बरा. पोलीस विभागाने हंगामपूर्व नियोजन न केल्याने ‘वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असल्याचे सध्याचे चित्र आहे.

लता शिंदे या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या त्यांच्या गावी जाण्यासाठी येत होत्या. यावेळी त्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. लिंगमळा ते वेण्णालेक या मुख्य रस्त्यावर तब्बल दीड तासांहून अधिक काळ त्यांना अडकून पडावे लागले. अखेर दीड तासांच्या प्रयत्नानंतर त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. वेण्णालेक व परिसरात पोलिसांची अधिक कुमक आवश्यक असताना या ठिकाणी दोन कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवत होते. पाहावयास मिळले. अशाच काहीशी परिस्थिती सर्वच रस्त्यांवर असून स्थानिक पोलीस अधिकारी मात्र, कुठेच पाहावयास मिळाले नाहीत.

महाबळेश्वर येथे देशविदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. विशेषतः दिवाळी, उन्हाळी हंगामासोबतच नाताळच्या हंगामामध्ये पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. सध्या दिवाळी हंगामामुळे पर्यटकांच्या आगमनाने हे पर्यटनस्थळ फुलले आहे. नौका विहारासाठी प्रसिद्ध असलेले वेण्णालेकसह प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहे.
दरम्यान, वाहतूक कोंडीची मोठी समस्या पर्यटकांसह स्थानिकांना सतावत आहे. मॅप्रो गार्डनजवळ होणारी वाहतूक कोंडी त्यानंतर महाबळेश्वरमध्ये प्रवेश करताना वेण्णालेककडून महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महाबळेश्वर शहरांतर्गत असलेले रस्त्यांची तर याहून वाईट परिस्थिती आहे वेण्णालेक वरून येताना मखारिया गार्डन, एस टी स्टॅन्ड परिसर, बाळासाहेब ठाकरे चौक, मस्जित रस्ता, सुभाष चौक, शिवाजी चौक, मरी पेठ परिसर, आराम खिंड याबरोबरच येथील श्री क्षेत्र महाबळेश्वर रस्ता, ऑर्थरसीट पॉईंट, केट्स पॉईंट या प्रेक्षणीय स्थळावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र असते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button