सातारा : आधी व्यापाऱ्यांचे पुर्नवसन त्‍यानंतर मेडिकल कॉलेजचे बांधकाम करा; आ. महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी | पुढारी

सातारा : आधी व्यापाऱ्यांचे पुर्नवसन त्‍यानंतर मेडिकल कॉलेजचे बांधकाम करा; आ. महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी

खेड(सातारा), पुढारी वृत्तसेवा : साताऱ्याचे आरोग्य व्हीजन ठरणाऱ्या कृष्णा नगर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम गुरुवारी आ. महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले.  आधी येथील व्यापाऱ्यांचे पुर्नवसन आणि त्‍यानंतर मेडिकल कॉलेजचे बांधकाम, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला हाेता.

साताऱ्यात मेडिकल कॉलेज व्हावे, येथील व बाहेरील तरूणांना चांगले शिक्षण मिळावे तसेच या परिसराचा व साताऱ्याचा विकास व्हावा ही आ. महेश शिंदे यांची भूमिका आहे. परंतु ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेजची इमारत उभी केली जात आहे. त्या ठिकाणी सुमारे ५० ते १०० व्यापारी कुटुंबांना राहण्यासाठी तसेच व्यवसायासाठी पाटबंधारे विभागाने १०० वर्षाच्या कराराने जागा दिली होती; परंतु कॉलेजच्या इमारतीचा आराखडा मंजूर झाला. येथील व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांची घरे व दुकानगाळे  उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.

महेश शिंदे यांनी मध्यस्थीची भुमिका घेवून विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. व्यावसायिक, नागरिकांना घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यांचे नुकसान झाले आहे. त्या व्यापारी नागरिकांचे शासनाने आधी पुर्नवसन करावे मगच मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी आ. महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. जो पर्यंत पुर्नवसन होत नाही तो पर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी माजी जि. प. सदस्य संदिप शिंदे यांनी दिला. या वेळी खेडचे माजी सरपंच शामराव माने, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा 

 

Back to top button