खासदार उदयनराजे भोसलेंनी केले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींचे अभिनंदन | पुढारी

खासदार उदयनराजे भोसलेंनी केले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींचे अभिनंदन

सातारा : पुढारी वृत्तसेवा: छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य देवून महिलांचा सन्मान करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या ऐतिहासिक सातारानगरीला मी अवश्य भेट देईन. असे आश्वासन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिले. भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मूजी यांची निवड झाली. त्यानिमित्त नवनिर्वाचित राष्ट्रपतींची भेट घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार  द्रौपदी मुर्मूजी यांची राष्‍ट्रपतीपदी प्रचंड मताधिक्यांनी निवड झाली. सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला आणि भारताच्या दुसऱ्या महिला आहेत. मुर्मू यांची या पदावर निवड करून भारताने नवीन इतिहास रचला.

या भेटीत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे एक प्रतिक राजमुद्रा आणि पुष्पगुच्छ भेट देवून राष्ट्रपतींचा सन्मान केला. यावेळी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना साताऱ्याचा ऐतिहासिक तसेच सामाजिक वारसा सांगितला. छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या सातारा नगरीत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. त्यांनी आपल्या रयतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. विशेषतः महिलांच्या शिक्षणाची सोय साताऱ्यात निर्माण केली. अशा या ऐतिहासिक सातारा नगरीला आपण आवश्य भेट द्यावी, अशी विनंती करून राष्ट्रपतींना निमत्रित केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांनी काही काळ शिक्षिका म्हणून नोकरी केली. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व चांगलेच माहीत आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे महत्व त्यांना माहीत आहे. त्यामुळे ज्या सातारच्या छत्रपती घराण्याने महिलांच्या शिक्षणाचा वारसा निर्माण केला अशा मराठा साम्राजाच्या राजधानीस मी आवश्य भेट देईन. तसेच सातारा नगरीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सहकार्य देवू, असे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचलंत का? 

Back to top button