Jitendra Awhad : कळवा येथील तिसरा खाडीपूल खुला करा : जितेंद्र आव्हाड | पुढारी

Jitendra Awhad : कळवा येथील तिसरा खाडीपूल खुला करा : जितेंद्र आव्हाड

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील वाहतूक कोंडीमुळे कळवेकरांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खाडीवरील तिसरा पूल जेवढा झाला आहे; तेवढा तरी वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी माजी मंत्री तथा कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

सन 2013-14 साली जेव्हा असीम गुप्ता हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते; तेव्हा कळव्याचा पहिला पुल खचल्यानंतर दुसर्‍या पुलाची निर्मिती झाल्यानंतर त्याच्यावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता त्यावर उपाय म्हणून कळवा खाडीवर तिसर्‍या पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी डॉ. आव्हाड यांनी (Jitendra Awhad) केली होती. या मागणीला तत्कालीन आयुक्त गुप्ता यांनी हिरवा कंदील दाखवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती.

कळवा खाडीवरील हा तिसरा पुल आता जवळ-जवळ वाहतुकीसाठी तयार झाला आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता वाहतूक कोंडीने लोक हैराण झाले आहेत. कळव्यातील रस्त्यांवर खड्डे नसल्यामुळे अंतर्गत प्रवासासाठी नागरिकांना कुठेही अडचण येत नाही. परंतु, ठाण्यात जाण्यासाठी कळवा पूल ओलांडावा लागत आहे. त्यातच ठाणे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा ताण कळव्यातील वाहतुकीवर पडत आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कळव्यामध्ये विशिष्ट वेळेत जड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण, त्या गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा परिणाम, विद्यार्थी आणि नोकरदारांना सहन करावा लागत आहे. यामध्ये समान्य नागरिकांची काहीच चूक नाही. त्यामुळे कमीत-कमी जो पूल तयार झाला आहे; तो नागरिकांच्या वापरासाठी सुरु करावा, जेणेकरुन थोडीफार वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे डॉ. आव्हाड यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्तांनी उच्च न्यायालयाचा आदेश मानून त्यापद्धतीने वाहतुकीची व्यवस्था करायला हवी. पण, हे कितीवेळा आणि कोणाला सांगायचे. उच्च न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवणार असाल, तर मग तक्रारच कोणाकडे करायची. मला वाटते कायद्याचे पालन व्हायला हवे. उच्च न्यायालयाचे आदेश मानायला हवेत, असेही डॉ. आव्हाड यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button