महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव ओव्हर फ्लो (व्हिडिओ) | पुढारी

महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव ओव्हर फ्लो (व्हिडिओ)

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : पावसाचे माहेरघर असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून धुवाँधार पाऊस सुरु आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले, त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणीवासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

महाबळेश्वर शहर व परिसरात संपूर्ण जून महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरु होता. गतवर्षी इतका पाऊस जून महिन्यात पडला नाही मात्र जुलै महिन्याच्या प्रारंभापासूनच शहर व परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. आजही पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरूच आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणीकरांची तहान भागविणारे, पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण व नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे. शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले. या वेण्णालेक मधून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.

पाहा व्हिडिओ :

हेही वाचलंत का?

Back to top button