

कराड ः पुढारी वृत्तसेवा
गोळेश्वर येथील स्व. पै. खाशाबा जाधव यांनी फिनलंडमधील हेलसिंकी येथे सन 1952 साली ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले वैयक्तिक क्रीडा कांस्य पदक मिळवून दिले होते. त्यांची राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्याची इच्छा आज 40 वर्षांनंतरही अपूर्णच आहे; मात्र आता राज्य शासनाने रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 25 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर केला असल्याने स्व. खाशाबांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची आशा पल्लवित झाली आहे. स्व. पै. खाशाबा जाधव यांना प्रथम ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून डावलण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर पटियालाच्या महाराजांनी या लक्ष घालून ऑलिम्पिकमध्ये निवड
झालेल्या मल्लाशी खाशाबा जाधव यांची पुन्हा कुस्ती लावण्याची सूचना केली आणि यात खाशाबा जाधव यांनी बाजी मारत ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवत स्वातंत्र्यानंतर देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले पदक मिळविले होते. 4 ऑगस्ट 1984 साली शेणोली येथील अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी आपले गुरू गोविंद नागेश पुरंदरे यांच्याकडे गोळेश्वरमध्ये नवोदित मल्लांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा आजही अपूर्णच आहे.
तब्बल 15 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर 1 कोटी 58 लाखातून केवळ राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या संरक्षक भिंतीचेच काम करण्यात आले आहे. त्यामुळे ऑलिम्पिकवीर जाधव यांची अहवेलना अजून किती काळ सुरू राहणार ? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यानंतर आता शासनाने 25 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर करत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव कुस्ती संकुलास गती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच चार दशकानंतर स्व. खाशाबा जाधव यांचे राष्ट्रीय कुस्ती संकुल उभारण्याचे स्वप्न साकार होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.