कराड : पुढारी वृत्तसेवा
स्वतंत्र भारताला ऑलिम्पिक खेळामध्ये पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्याचे भूमिपूत्र पै. खाशाबा जाधव यांना विशेषबाब म्हणून मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात यावा अशी विनंती साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे केली आहे.
दरम्यान यासाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीने आपण शिफारस करावी अशी मागणी पद्म पुरस्कार शिफारस समितीचे अध्यक्ष ना. आदित्य ठाकरे यांना देखील केली आहे.खा. श्रीनिवास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे पद्म पुरस्कार शिफारस समितीचे अध्यक्ष ना. आदित्य ठाकरे यांना याबाबत पत्र लिहून ही विनंती केली आहे. पत्रात म्हटले आहे की, कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील स्व. पै. खाशाबा जाधव यांनी सन 1952 मध्ये हेलसिंकी येथे ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाइल बॅन्टमवेट कुस्तीमध्ये 'कांस्यपदक' मिळविले. भारत सरकारने 1952 मध्ये त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकिट देखील छापले होते. तसेच 2000 साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार 'अर्जुन अवार्ड' देऊन त्यांचा गौरव केला होता.
पै. खाशाबा जाधव यांनी त्याकाळी प्रशिक्षण, सोयीसुविधांचा अभाव असून सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत असामान्य कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल केले. सातारा जिल्ह्याचा लौकीक सातासमुद्रापार नेला. त्यांनी कुस्तीमध्ये मिळविलेले कांस्यपदक सन 1952 पासून पुढील 44 वर्षे भारतासाठी मिळविलेले एकमेव व्यक्तिगत पदक होते.
राष्ट्राला दिलेली सेवा आणि कुस्ती क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. तसेच नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. मागील अनेक वर्षांपासून त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी नागरिक व क्रीडाप्रेमींमधून होत आहे. या मागणीची दखल खा. पाटील यांनी घऊन याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे.
साधारणतः जीवनकाळातच पद्म पुरस्कार दिला जातो. परंतु विशेष बाब म्हणून हा पुरस्कार दिला जावा. त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने मरणोत्तर सन्मान करण्यात यावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खा. श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.