सातारा :उत्तीर्णांपेक्षा प्रवेश क्षमतेचा टक्‍का अधिक | पुढारी

सातारा :उत्तीर्णांपेक्षा प्रवेश क्षमतेचा टक्‍का अधिक

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात यावर्षी दहावी उत्तीर्णांचा टक्‍का वाढला आहे. लवकरच इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यात एकूण प्रवेश क्षमता 51 हजार 880 असून यावर्षी नियमित व रीपिटर असे एकूण 38 हजार 897 विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे 11 वी प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्णांचा टक्‍का कमी असल्याने कोणीही प्रवेशापासून वंचित राहणार नसल्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांचा कल व पसंतीचा विचार करता नामांकित महाविद्यालयांमध्ये मात्र प्रवेशासाठी चुरस राहणारआहे.

जिल्ह्याचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 98.29 टक्के लागला आहे. दरवर्षी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला की साधारण 15 दिवसांत गुणपत्रक विद्यार्थ्यांच्या हातात येते. तत्पूर्वीच अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू होतो. त्यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज भरले जातात. गुणपत्रक हातात मिळाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये माहिती पत्रक वितरण सुरु होते. त्यातील प्रवेश अर्ज भरुन त्यासोबत आवश्यक कागदपत्र व गुणपत्रकाची झेरॉक्स जोडून ऑफलाईन पद्धतीनेच पुढील सर्व प्रवेश प्रक्रिया पार पडत असते.

ग्रामीण भागात सर्रास ऑफलाईनच प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यावर्षी जिल्ह्यात दहावीचे नियमितचे 37 हजार 944 तर रीपिटरचे 953 असे एकूण 38 हजार 897 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात विविध विद्याशाखांची एकत्रित प्रवेश क्षमता 51 हजार 880 इतकी आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये अनुदानित व विना अनुदानित, स्वयं अर्थसहायित तुकड्यांसाठी उपलब्ध विद्यार्थी संख्येच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने यावर्षी देखील कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नसल्याचे चित्र आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांकडून काही ठराविक महाविद्यालयातच प्रवेशासाठी अट्टाहास केला जातो. त्यामुळे अशा काही नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस राहणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी शिस्तबद्ध शालेय जीवनातून नुकतेच महाविद्यालयात प्रवेश घेणार आहेत. त्यातच दोन वर्षानंतर नवीन शैक्षणिक वर्ष ऑफलाईन सुरू झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनाची उत्कंठा या विद्यार्थ्यांना लागली असल्याने, अकरावी प्रवेशाची उत्सुकताही वाढली आहे.

Back to top button