सातारा : लोणंदच्या विद्यार्थ्यांनी बनवली सौरऊर्जेवर चालणारी प्रदूषणमुक्त कार | पुढारी

सातारा : लोणंदच्या विद्यार्थ्यांनी बनवली सौरऊर्जेवर चालणारी प्रदूषणमुक्त कार

 शशिकांत जाधव : लोणंद  लोणंद येथील अभिषेक शेळकेसह त्याच्या माळेगाव (ता. बारामती) येथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी प्रदूषणमुक्त कार तयार केली आहे. ही कार दुचाकीहून कमी किंमतीस असून, टाकाऊ वस्तूंपासून बनविली आहे.

अभिषेक शेळके हा लोणंद बाजार समितीचे उपसचिव अमोद शेळके यांचा मुलगा व लोणंद मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश शेळके यांचा पुतण्या आहे. सौर उर्जेवर कार बनविणारे ललित मोहिते, पीयूष उगले, अभिषेक शेळके, मिनेश गवाळे या चारही विद्यार्थाचे कौतुक करण्यात येत आहे.

जगभरात वायू प्रदूषणाबरोबर दरवाढीची इंधन समस्या निर्माण झाली आहे. अशावेळी बारामतीतील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या चार विद्यार्थ्थानी सौर उर्जेवर चालणारी प्रदूषणमुक्त टाकाऊ वस्तुपासुन चारचाकी वाहनाची निर्मिती केली आहे. या चारचाकी वाहनांची किंमत दुचाकी गाडीच्या किमतीपेक्षा कमी आहे. ही कार ७० ते ८० हजार रुपयांत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असा दावा विद्यार्थ्थानी केला आहे.

सध्या वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रक वाहनांची निर्मिती केली आहे. मात्र, यापेक्षा वेगळे काही तरी करण्याची कल्पना विद्यार्थ्यांना सुचली. यानुसार, सर्व विद्यार्थ्थाना सेल्फ चार्ज व्हेईकल कार बनवण्याची कल्पना केली. त्यानुसार सौर ऊर्जेवर धावणारे चारचाकी वाहन बनवले. या चारचाकी वाहनाला पुढच्या बाजूला एक १०० वॅट सोलर पॅनल व मागील बाजूस दोन ४२ वॅटचे पॅनल बसवले आहेत . ४८ वॅटची बॅटरी एका तासामध्ये पूर्ण चार्ज होते. ही गाडी दिवसा चार्ज करण्याची कसलीही गरज नाही. रात्री नऊ तास गाडी चालू शकते, असेही विद्यार्थीनी सांगितले आहे.

तसेच टाकाऊपासून टिकाऊ हे वाहन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना परवडू शकते. वाहनात चार व्यक्ती बसू शकतात. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गाडीमध्ये चारशे किलोपेक्षा अधिक वजन वाहू शकते. घरातील वीज गेल्यानंतर मोबाइल, लॅपटॉप व घरातील ३५ वॅटपर्यंतची इतर उपकरणे सहज वापरता येऊ शकतात. १०० टक्के सौरऊर्जेवर धावते दिवसा कधीही चार्जिंग संपत नाही, १०० टक्के मोबाइलवरून ऑपरेट करता येते, असेही अभिषेक शेळके याने सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button