फलटण डबल मर्डर; एलसीबी कडून संशयिताला तासाभरात अटक | पुढारी

फलटण डबल मर्डर; एलसीबी कडून संशयिताला तासाभरात अटक

फलटण : पुढारी वृत्तसेवा

फलटण डबल मर्डर प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठे यश मिळाले आहे. फलटणमधील सोमवार पेठेत भरदिवसा आर्थिक व्यवहारातून धारदार शस्त्राने पती-पत्नीवर खुनी हल्ला झाला होता. यात पती जागीच ठार झाला होता तर गंभीर जखमी असलेल्या पत्नीचाही दुसर्‍या दिवशी मृत्यू झाला.

एका तासात आरोपी ताब्यात

रविवारी घडलेल्या घटनेनंतर संशयित आरोपीला अवघ्या एका तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) अटक केली. अटक करुन त्याला न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, एलसीबी टीममुळे फलटण डबल मर्डर प्रकरणी वेगाने गुन्हेगारापर्यंत पोहचता आले.

राचूर्‍या एकनाथ काळे (वय 29) असे मर्डर झालेल्याचे नाव असून या घटनेत गंभीर जखमी झालेली त्याची पत्नी रोशनी काळे (वय 23, दोघे रा.बरड ता.फलटण) हिचा सोमवारी मृत्यू झाला. दरम्यान, पप्या उर्फ शूरवीर राजू पवार (वय 25, रा.सोमवार पेठ, फलटण) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

फलटण डबल मर्डर आर्थिक वादातून

दि. ८ रोजी संशयित आरोपी, राचूर्‍या व त्याची पत्नी या तिघांमध्ये आर्थिक व्यवहारातून सकाळी ११.३० वाजता जोरदार वादावादीला सुरुवात झाली. त्यानंतर संशयित पप्या पवार याने सोबत आणलेला धारदार चाकू काढून राचूर्‍यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. पतीला वाचवायला पत्नी सरसावली. आरोपी पप्या पवारने त्या पत्नीवरही सपासप वार केले.

राचूऱ्यावर झालेले वार वर्मी लागल्याने तो जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेतील रोशनी काळे हिला फलटण व त्यानंतर सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तोपर्यंत या घटनेची माहिती फलटण पोलिसांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

एलसीबीने तपासचक्र केले गतीमान

फलटण डबल मर्डर प्रकरणी पोलिसांचा पंचनामा सुरु असतानाच तपासाची सुत्रे एलसीबी पथकाला मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून तपासाची चक्रे गतीमान केली. दरम्यान, रोशनी काळेवर उपचार सुरु असताना सोमवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, डीवायएसपी डॉ.निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर धुमाळ, सपोनि आनंदसिंग साबळे, पोलिस हवालदार संतोष पवार, गणेश कापरे, सचिन ससाणे, विशाल पवार, विजय सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : जेव्हा कोल्हापूरकर चित्ते पाळून करायचे शिकार 

Back to top button