सातारा :‘जलसिंचन’च्या खाबूगिरीचे वस्त्रहरण | पुढारी

सातारा :‘जलसिंचन’च्या खाबूगिरीचे वस्त्रहरण

सातारा : पुढारी वृत्‍तसेवा
कोयना धरणाजवळ उभारण्यात आलेल्या चमरी विश्रामगृहाला राज्य शासनाकडून 2 कोटी 40 लाखांचा निधी देण्यात आला. मात्र, नवी इमारत बांधण्यापेक्षा अभियंत्यांनी जुन्या इमारतीचीच डागडुजी केली. काम निकृष्ट झाल्याचा ठपका ठेवत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसिंचन विभागाच्या कारभाराची पोलखोल केली.

त्यांनी संपूर्ण कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण केले. गुणवत्तेचा टेंभा मिरवणार्‍या व स्वच्छ कारभाराच्या बाता मारणार्‍या अधीक्षक अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंत्यांपर्यंत व बोगसगिरीला प्रोत्साहन देणार्‍या उपअभियंत्यांपासून ते शाखा अभियंत्यांपर्यंत जलसंपदा तथा पाटबंधारे तथा जलसिंचन विभागाचे अजितदादांनीच वस्त्रहरण केल्याने या सर्व अधिकार्‍यांवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. या संपूर्ण विभागाचे ऑडिट करण्याची मागणी जिल्हावासीयांनी केली आहे.

दर्जा व गुणवत्तेचा अजोड व उत्कृष्ट नुमना म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते. याच जोरावर कोयना धरणाने आजवर शेकडो भूकंपाचे धक्के पचवले. जलसंपदा विभागाच्या ताब्यात असलेल्या या धरण क्षेत्रात अलीकडच्या काळात प्रचंड बोगस प्रकार वाढले आहेत. धरण देखभाल दुरुस्तीच्या कामांतून प्रचंड हाणले जात आहेत. ठेकेदारांच्या आडून मलिदा लाटण्यासाठी नाहक कामे काढली जात असून लाखोंची उधळपट्टी सुरु आहे. अभियंते व ठेकेदारांच्या खाबुगिरीमुळे धरणांना धोका निर्माण झाला आहे. भेटी अथवा दौरे नसतानाही कोयना धरणाची सतत रंगरंगोटी करुन वारेमाप खर्च करुन पैशाची उधळपट्टी केली जाते.

जलसिंचन विभागाच्या कारभाराचा जाहीर पंचनामा नुकताच झाला. कोयना धरणाने 61 वर्षे पूर्ण केली. त्याचे औचित्य साधून कोयना प्रकल्पाने नव्याने बांधलेल्या चमरी या विश्रामगृहाचे उद्घाटन व कोयना धरणग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता. चमरी विश्रामगृहाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार उद्घाटन कार्यक्रमात अभियंत्यांवर चांगलेच संतापले. मी कशाचे उद्घाटन केले हेच समजलेच नाही, अशा शब्दांत त्यांनी जलसिंचन विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

ना. अजित पवार म्हणाले, चमरी विश्रामगृहाच्या कामासाठी शासनाने 2 कोटी 40 रुपये खर्च केला. प्रत्यक्षात या चमरी विश्रामगृहावर झालेला खर्च मोठा असला तरी काम उत्कृष्ठ झालेले नाही. नवीन इमारतीऐवजी जुन्या इमारतीची केवळ डागडुजी, रंगरंगोटी केली. मोठ्या रक्‍कमेचे काम आर्किटेक्‍चरशिवाय झाल्याने त्यांनी आश्‍चर्य व्यक्‍त करुन प्रकल्पाच्या अभियंत्यांना फैलावर घेतले. विजेचे अनावश्यक पॉईंट, छोट्या आकाराची स्नानगृहे, दर्जाहिन फरशा, ग्रॅनाईट व आजूबाजूला कृत्रिम फुलांची सजावट या सर्व कामावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. कोयना प्रकल्पाच्या अभियंत्यांसह सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांची त्यांनी कानउघाडणी केली. अजितदादांनी अवघ्या 25 मिनिटांत चमरी विश्रामगृहाच्या कारभाराची पोलखोल केली. उद्घाटन कार्यक्रमातच विश्रामगृहाच्या गुणवत्‍ता व दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याने या प्रकरणात कोयना प्रकल्पाच्या अधिकार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button