Market : सेन्सेक्स घसरला, रुपया निचांकी पातळीवर, सोने आणखी महागले! | पुढारी

Market : सेन्सेक्स घसरला, रुपया निचांकी पातळीवर, सोने आणखी महागले!

पुढारी ऑनलाईन डेस्क

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक कायम आहे. यामु‍ळे चीनमधील आर्थिक घडामोडीचे प्रमुख शहर असलेल्या शांघाय शहरामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. यामुळे जागतिक आर्थिक वाढीला फटका बसू शकतो या गुंतवणुकदारांच्या चिंतेमुळे आज सोमवारी आशियाई शेअर बाजारात (Share Market) घसरण पहायला मिळाली.

भारतीय शेअर बाजारतही याचा परिणाम झाला. यामुळे शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) सकाळच्या सत्रात ६०० अंकांनी घसरला. निफ्टीही (Nifty) १६,२५० च्या खाली येऊन व्यवहार करत आहे. निफ्टीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँका, मेटल आणि एनर्जी उप-निर्देशांक टॉप लुजर्स ठरले. ही घसरण २ टक्क्यांहून अधिक होती.

दरम्यान, फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरवाढीमुळे अमेरिकेच्या ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाली आहे. यामुळे भारतीय रुपया (Indian Rupee) सोमवारी अमेरिकन डॉलरच्या (US dollar) तुलनेत निचांकी पातळीवर पोहोचला. देशांतर्गत इक्विटी बाजारातील कमकुवतपणा आणि परदेशातील गुंतवणूकदारांकडून सुरु असलेला विक्रीचा सपाटा यामुळे भारतीय रुपया घसरला असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रुपया सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५१ पैशांनी घसरून ७७.४१ रुपयांवर आला. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ पैशांनी घसरून ७६.९० वर बंद झाला होता. शांघायमध्ये कोविड लॉकडाऊन कडक केल्यामुळे जागतिक आर्थिक वाढीला फटका बसू शकतो. यामुळे आशियाई शेअर बाजारात (Share Market) आणखी घसरणीची भीती गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे.

सोने महागले, चांदी घसरली

दरम्यान, सोन्याच्या दरात (Gold prices) वाढ झाली आहे. MCX वर आज सोमवारी (दि.९) सोन्याचा दर वाढून प्रति १० ग्रॅम ५१,२५९ रुपयांवर पोहोचला. पण चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो ६२, ४५० रुपयांवर होता.

हे ही वाचा :

Back to top button