सत्तांतर करा; अन्यथा ही शेवटची निवडणूक ठरेल : नितीनकाका पाटील | पुढारी

सत्तांतर करा; अन्यथा ही शेवटची निवडणूक ठरेल : नितीनकाका पाटील

वाई : पुढारी वृत्तसेवा
ज्यांच्या कर्तृत्वामुळे संपूर्ण देशात त्यांचे आदराने नाव घेतले जाते त्या किसन वीर आबांच्या नावाची ज्यांनी बदनामी केली, ज्यांनी किसन वीर आबांचे नाव असलेल्या संस्थेवर हजार कोटी रुपयांचा बोजा चढवला, ज्यांनी सत्तेच्या धुंदीत व मस्तीत राहून शेतकर्‍यांना देशोधडीला लावले त्यांना कारखान्याच्या सत्तेतून पायउतार करुन सत्तांतर घडवा अन्यथा लोकशाही गिळंकृत होईल व ही शेवटची निवडणूक ठरेल. वेळ जाण्याआधीच किसन वीर वाचवा, किसन वीर आबांचे नाव वाचवा, किसन वीर कारखान्याची पत वाचवा, असे भावनिक आवाहन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांनी केले.

वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर, सातारा, जावली, कोरेगाव तालुक्यातील किसन वीर कारखान्यांच्या सभासदांशी संवाद साधताना नितीनकाका बोलत होते. ते पुढे म्हणाले, किसन वीर आबांनी ही संस्था उभी केली. आबांच्या नावामुळे देशभर किसन वीर कारखान्याचे नाव घेतले जाते. आबांचे दिल्‍ली दरबारीही वजन होते. सातारा जिल्ह्याचे नाव आबांच्या कर्तृत्वामुळे रोशन झाले होते. मात्र, गेली कित्येक वर्षे ज्यांच्या ताब्यात किसन वीर कारखाना आहे त्यांनी मात्र स्वत:च्या बेबंदशाहीमुळे, मदमस्त कारभारामुळे, सत्तेच्या धुंदीमुळे किसन वीर आबांचे नाव बदनाम करुन टाकले. शेतकर्‍यांनी कष्टाने घाम गाळून पिकवलेल्या उसाचे पैसेही या चेअरमनने हडप केले. भ्रष्टाचाराने कळस गाठला. हजारो कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर कारखान्यावर उभा केला. शेतकर्‍यांच्या पैशातूनच स्वत:च्या प्रॉपर्ट्या वाढल्या. स्वत: पापे करुन आमच्यावर ढकलून चेअरमन आता खुशीत गाजरे खात आहेत. कधीही जप्‍ती येऊ शकते अशी कारखान्याची अवस्था आहे. कारखाना वाचवायचा असेल तर व गेलेली पत पुन्हा मिळवायची असेल तर मकरंदआबांच्या नेतृत्वाखालीच हा कारखाना वाचू शकतो.

हा कारखाना वाचवायचा असेल तर केवळ मकरंदआबांच्या सक्षम नेतृत्वामुळेच तो वाचू शकेल. मात्र त्यासाठी सत्तांतर करणे आवश्यक आहे. तुम्ही सत्तांतर केले नाही तर कारखान्याची ही शेवटची निवडणूक असेल हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगून नितीनकाका पाटील म्हणाले, ही लढाई भोसले विरुद्ध पाटील अशी नाही तर ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. तुम्हाला सत्तेच्या मांडीखाली दाबून, कर्जाच्या उशाखाली चिरडून ऐश करणारा मदमस्त सत्ताधारी हवा आहे की तुमच्या सगळ्या अडचणींमध्ये, तुमच्या सुख-दु:खांमध्ये धावून जाणारा नेता कमी व मित्र जास्त असे आम्ही हवे आहोत? तुम्हाला शेतकर्‍यांना कर्जाच्या खाईत ढकलून निर्लज्जपणे हसणारा, केवळ मते मागायपुरता तुमच्या दारात येणारा, स्वत:च्या मुलाला खासगी कारखान्यात पार्टनर करणारा, गावात आलातर गाडीतल्या काचाही खाली न घेणारा काळा गॉगलवाला पाहिजे की तुम्ही संकटात आहे म्हणून या अग्‍नीकुंडात उडी घेणारा, काळ्यारात्रीला तुमच्या वेळेसाठी धावून येणारा, तुमच्या प्रत्येक उसाच्या कांड्याची काळजी घेणारा, कायम लोकांच्या गराड्यात असणारा, 24 तास लोकांची कामे करणारा, कारखाना कर्जमुक्‍त करुन दाखवणारा तुमचा माणूस हवा आहे याचा विचार करण्याची ही अंतीम घडी आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना, अमिषांना बळी पडू नका. किसन वीर कारखाना बचाव पॅनेलला आशीर्वाद द्या, असेही नितीनकाका म्हणाले.

सहा तालुक्यातील शेतकर्‍यांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व राहिला आहे. बेेधुंद कारभाराविरोधात तुम्ही जो आवाज उठवला आहे तो मतात परिवर्तीत करा. किसन वीर कारखान्यातील भ्रष्ट सत्ता उलटून टाका. मकरंदआबांच्या नेतृत्वाखाली किसन वीर कारखान्याचे नाव उज्ज्वल करून दाखवू या, असे आवाहनही नितीनकाका पाटील यांनी केले.

हिंदुस्थान शुगरशी आमचा संबंध नाही : आ. मकरंद पाटील
हिंदुस्थान शुगरसाठी आम्ही कुठेही शेअर्स गोळा केलेले नाहीत. आमच्यापैकी कुणीही त्यांच्यासाठी काम केलेले नाही. मात्र, तरीही चेअरमन जाहीर सभांमध्ये खोटे आरोप करत आहेत. हिंदुस्थान शुगरशी आमचा कोणाचाच कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण आ. मकरंद पाटील यांच्यावतीने देण्यात आले आहे.

Back to top button