‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ची घोषणा, रोहित शर्मा, बुमराहचा समावेश | पुढारी

‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ची घोषणा, रोहित शर्मा, बुमराहचा समावेश

मुंबई; वृत्तसंस्था : ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या दोघा भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

‘विस्डेन’चे संपादक लॉरेन्स बूथ यांनी पाच क्रिकेटपटूंच्या नावांची घोषणा केली. या पाच क्रिकेटपटूंच्या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे, इंग्लंडचा ओली रॉबिन्सन, दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघातील डेन व्हॅन नेकेर्क यांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, डेव्हॉन कॉनवेने कसोटी सामन्यात पदार्पणातच द्विशतक झळकावले आणि न्यूझीलंडला अव्वल स्थानावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

द हंड्रेडच्या पहिल्या सत्रात ओव्हलच्या संघाला विजय मिळवून देण्यात दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू डेन व्हॅनचा मोलाचा वाटा होता. द हंड्रेड ही इंग्लंडच्या महिला क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारी लीग असल्याचे बूथ यांचे मत आहे.

रोहित शर्माचे योगदान

बूथ यांनी रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. इंग्लंड दौर्‍यात भारताला चार कसोटी सामन्यांत 2-1 अशी आघाडी देण्यात रोहितने अप्रतिम कामगिरी बजावली. त्याने पहिल्या सामन्यात 36 आणि 12 धावा केल्या. त्यानंतर दुसर्‍या कसोटीत 83 आणि 21 धावा केल्या. त्यानंतर तिसर्‍या कसोटीत पहिल्या डावात 19 आणि दुसर्‍या डावात 59 धावा केल्या. चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने 11 आणि दुसर्‍या डावात 127 धावा केल्या.

बुमराहची दमदार कामगिरी

इंग्लंड दौर्‍यात जसप्रीत बुमराहने दमदार कामगिरी केली होती. बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला होता. या कसोटीत त्याने एकूण 9 गड्यांना तंबूत पाठवले होते. त्यामुळेच त्याला ‘विस्डेन क्रिकेट ऑफ ईयर’मध्ये स्थान देण्यात आले आहे. या दौर्‍यात बुमराहने एकूण 18 गडी बाद केले. नॉटिंगहॅम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने 46 धावा देऊन 4, तर दुसर्‍या डावात 64 धावांच्या मोबदल्यात 5 मोहरे टिपले.

Back to top button