सातारा : भोळेवाडी येथील शिवारात आढळली बिबट्याची पिल्ले | पुढारी

सातारा : भोळेवाडी येथील शिवारात आढळली बिबट्याची पिल्ले

उंब्रज, पुढारी वृत्तसेवा : भोळेवाडी (ता. कराड) येथील शिवारात ऊस तोड सुरू असताना कामगारांना अंदाजे पंचवीस ते तीस दिवस वयाची दोन बिबट्याची पिल्ले आढळून आहेत. ही बाब शनिवार दि. 16 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. घटनेची माहिती समजताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही पिल्लांना सुरक्षित ठिकाणी ठेवून बिबट्याच्या हलचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेराचा सेटअप लावण्यात आला आहे.

दरम्यान शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने भोळेवाडी व परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, भोळेवाडी येथील काशिनाथ गिरी यांच्या डोंगराजवळ असणार्‍या ऊसाच्या शेतात ऊसतोड सुरू होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ऊस तोड कामगार यांना बिबट्याची दोन लहान पिल्ले आढळून आली. सदरची माहिती शेताचे मालक काशिनाथ गारी यांना सांगितली असता त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनरक्षक शितल पाटील, उत्तम पांढरे, शंभू माने, अश्विन पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सदर दोन्ही पिल्ले अंदाजे पंचवीस ते तीस दिवस वयाची असल्याची माहिती वनक्षेत्रपाल तुषार नवले यांनी दिली. वनविभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेराचा सेटअप लावला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल तुषार नवले यांनी दिली.

ग्रामस्थांनी शेतात जाताना ग्रुपने जावे. लहान मुलांना शेतात घेऊन जाणे टाळावे. तसेच शेतात जाताना मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत.
– तुषार नवले
वनक्षेत्रपाल कराड

हेही वाचलतं का?

Back to top button