वोलदोमीर झेलेन्स्की म्हणाले, रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्यासाठी तयारीत राहावे | पुढारी

वोलदोमीर झेलेन्स्की म्हणाले, रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्यासाठी तयारीत राहावे

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्ध इतक्यात थांबण्याची अजिबात चिन्हे नसून उलट आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलदोमीर झेलेन्स्की यांनी जगाला रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयारीत राहा, अशा शब्दात जागरूकतेचे आवाहन केले आहे. रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या वापराबाबत जगाने तयारीत राहण्याची गरज आहे, असे झेलेन्स्की म्हणाले.

एएफपी या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार युक्रेनमध्ये पत्रकारांशी बोलताना वोलदोमीर झेलेन्स्की म्हणाले की, रशिया अण्वस्त्रांचा वापर करेल त्या वेळेची वाट आपण पाहता कामा नये. उलट अशा हल्ल्यासाठी आधीपासूनच तयारी केली पाहिजे. ते कुठल्याही शस्त्राचा वापर करू शकतात. मला त्याची खात्री आहे. त्यामुळेच किरणोत्सर्गरोधी औषधांचा साठा करावा आणि हवाई हल्ल्यांपासून बचावासाठी शेल्टर्सची गरज भासेल. दरम्यान, या आधी शुक्रवारीही झेलेनस्की यांनी पुतीन यांचा जगाला असलेल्या धोक्याबाबत इशारा दिला होता.

क्रेमलिनने म्हटले होते की, ज्या दिवसापासून युद्धाला सुरुवात झाली त्याच दिवसापासून म्हणजे 24 फेब्रुवारीपासून रशियाने अण्वस्त्र दलाला हाय अलर्टवर ठेवले आहे. पुतीन यांनी रशियन फौजेला अण्वस्त्र युद्धाच्या सरावाचे आदेशही दिले होते. तर क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेसकोव्ह यांनी म्हटले होते की, रशियाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यास रशिया युक्रेनिविरोधात अण्वस्त्रांचा वापर करेल.

तज्ज्ञांच्या मते, युक्रेनविरोधात अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने रशियाच्या महाशक्ती या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यामुळे सुपरपॉवर या इमेजसाठी रशिया युक्रेनविरोधात अण्वस्त्रांचा वापर करू शकतो. तसेच काळ्या समुद्रात रशियाची मोस्कवा ही युद्धनौका युक्रेनने क्षेपणास्त्र डागून बुडवल्याने रशियाचे सैनिकांत चलबिचलता आहे.

रशियाचा आणखी एक जनरल ठार

रशियन लष्करातील मेजर जनरल व्लादिमीर फरोलोव्ह यांचा युद्धात मृत्यू झाला आहे. रशियाच्या आक्रमणानंतर जनरल पदावरील मृत्यू झालेले ते आठवे अधिकारी आहेत.

Back to top button