

वाई, पुढारी वृत्तसेवा : युवतींना नेतृत्व करण्याची संधी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस वेगाने वाढण्यास वेळ लागणार नाही. राज्यात राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष होईल. ज्या पद्धतीने भाजपचा सोशल मीडिया प्रपोगंडा पसरवण्याचे काम करते त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी युवकांची ताकद उभी करा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचे वाई येथे उत्साही स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकच्या महिला प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, युवकचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रतापराव पवार, शशिकांत पिसाळ, सारंग पाटील, पै.विक्रांत डोंगरे, अनिल जगताप, मनीषा गाढवे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. जयंत पाटील म्हणाले, पक्षवाढीसाठी पक्षाच्या फादर बॉडी बरोबर युवक व युवतींच्या कार्यकारिणीची स्थापना करा, बुध प्रमुख नेमा, पक्षाच्या परिवार संवाद यात्रेचे महत्व लक्षात घेवून कामाला लागा. त्याशिवाय राष्ट्रवादी पक्ष खंबीर होणार नाही. पक्षवाढी साठी गावापातळीवर नियोजन करणे गरजेचे.ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, परिवार संवाद यात्रेमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळते. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात पक्ष बांधणीसाठी कुठेही कमी पडणार नाही. खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, कार्यकर्ता आणि जनता यांच्यामध्ये संवाद वाढला पाहिजे. संवादामुळे एकमेकांना बळ मिळते.
जनतेच्या सुख, दुःखात सहभागी झाला तर संवाद वाढतो. आ. मकरंद पाटील म्हणाले, वाई मतदार संघातील कार्यकर्त्यांनी चिकाटीने काम केलं पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही समर्थपणे पेलू, सर्वांनी मेहनत घेतली तर राष्ट्रवादी राज्यात नंबर एकचा पक्ष होईल. यावेळी प्रमोद शिंदे,दत्तानाना ढमाळ, हरिभाऊ सपकाळ यांनी राष्ट्रवादी कार्यकारिणीचा आढावा घेतला.