कर्नाटक : आजही आठवण ताजी..भाकरी, मेथीची भाजी ; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बेळगाव भेट | पुढारी

कर्नाटक : आजही आठवण ताजी..भाकरी, मेथीची भाजी ; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बेळगाव भेट

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे असामान्य व्यक्तिमत्त्व. वर्षांनुवर्षे दैन्य, दारिद्र, अज्ञान यामध्ये गुरफटलेल्या आणि फसलेल्या समाजाला त्यांनी ज्ञानाचा प्रकाश दाखविला. या महामानवाने बेळगावातील कंग्राळ गल्लीला 26 डिसेंबर 1939 ला भेट दिली. मेथीची भाजी आणि भाकरीचा आस्वाद घेतला. जाताना मुलींनो, खूप खूप शिका असा मौलिक संदेश दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेल्या आठवणी आजही कंग्राळ गल्ली परिसरातील नागरिकांनी काळजाच्या कप्प्यात प्राणपणाने जपल्या आहेत. भेट दिलेल्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात येते.
डॉ. आंबेडकरांचे आयुष्य म्हणजे वादळ. दलित समाजाच्या विकासाचे व्रत हाती घेतलेल्या बाबासाहेबांनी देश सारा पालथा घातला. या सार्‍या धावपळीतून सवड काढून केवळ एकदाच त्यांनी बेळगावला भेट दिली. 26 डिसेंबर 1939 रोजी त्यांचे बेळगावच्या रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. त्याठिकाणी नागरिकांनी फार मोठी गर्दी केली होती. तेथून मोटारीतून कंग्राळ गल्लीत आणण्यात आले. गवळी गल्लीच्या कोपर्‍यापासून कंग्राळ गल्लीतील मेत्री यांच्या घरापर्यंत लाल कार्पेट अंथरण्यात आले होते. एखाद्या नेत्यासाठी लाल कार्पेट अंथरण्याचा बेळगावातील हा पहिलाच प्रसंग होता.

त्याठिकाणी बाबासाहेबांनी सिद्धव्वा मेत्री यांनी तयार केलेली मेथीची भाजी आणि भाकरीचा आस्वाद घेतला. बाबासाहेबांना मेथीची भाजी आणि भाकरी खूप आवडत असे. यामुळे बाबासाहेबांसाठी भाकरी आणि मेथीची भाजी तयार करण्यात आली होती.
जेवण झाल्यानंतर बाबासाहेबांनी जेवण तयार केलेल्या महिला आणि मुलींची आस्थेने चौकशी केली. मुलींना खूप शिका आणि आयुष्यात मोठ्या व्हा, असा संदेश दिला.

तेथून नगरपालिकेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात सहभाग घेतला. नगराध्यक्ष भीमराव पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सत्कार करण्यात आला. बेळगाववासीयांतर्फे मानपत्र देण्यात आले. सत्कारानंतर बाबासाहेब हुबळी, धारवाडकडे रवाना झाले.
1940 पासून जन्मदिवस देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी साजरी करण्यात येते. परंतु बेळगावातील कंग्राळ गल्लीत 1940 पासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मदिवस साजरा करण्यात येत होता. त्यांचे महानिर्वाण झाल्यानंतर 14 एप्रिल रोजी जयंती सातत्याने साजरी करण्यात येत असल्याची माहिती ज्येष्ठ कार्यकर्ते सिद्राम मेत्री यांनी दिली.

भेट दिलेल्या ठिकाणी नवीन घर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कंग्राळ गल्लीतील मेत्री यांच्या घरी भेट दिली. ते जुने घर काढून नवीन घर बांधण्यात आले आहे. येथील भेटीचे एकही छायाचित्र दुर्दैवाने सध्या उपलब्ध नाही.

हेही वाचलत का ?

Back to top button