बंगळूर : बस प्रवास दरात गुपचूप वाढ? | पुढारी

बंगळूर : बस प्रवास दरात गुपचूप वाढ?

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल दरवाढ होत आहे. तरी बस प्रवास दरवाढीचा निर्णय सरकारकडून जाहीर झालेला नाही. पण, गदग-हुबळी मार्गावरील प्रवास अचानक 15 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. कोणतीही जाहीर वाच्यता न करता गुपचूप वाढ केल्याने प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

इंधन दरवाढ, स्वयंपाक गॅस दरवाढीने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक फटका सामान्यांना बसला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे तोट्यात असणार्‍या मार्ग परिवहन महामंडळांनी अनेकदा बस प्रवास दर वाढवण्याची मागणी सरकारकडे केली. पण, विविध निवडणुका आणि इतर कारणांमुळे दरवाढीला नकार देण्यात आला. आता पुन्हा एकदा बस प्रवास दरवाढीची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात सर्वच मार्गांवरील बससेवा महागण्याची चिन्हे आहेत.

हुबळी ते गदगपर्यंतचे अंतर 60 कि. मी. आहे. या प्रवासासाठी 60 रुपये तिकीट दर होता. पण, अचानक हा दर 15 रुपयांनी वाढवण्यात आला. गदग, कोप्पळ गंगावती, बळ्ळारी, होस्पेट येथे कामानिमित्त रोज प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. पण, तिकीट दरवाढीने त्यांना फटका बसत आहे.

हुबळीनजीक असणार्‍या नेलवडी येथील टोलवर दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. येथून जाणार्‍या ट्रक आणि अवजड वाहनांना एकतर्फी प्रवासासाठी 395 रुपये आणि रिटर्न प्रवासासाठी 595 रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे बस तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे.

Back to top button